राज्यभरात पावसामुळे धरणे, नद्या-नाले दुथडी भरून वाहिले !
मुंबई – राज्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. नद्या-नाले दुथढी भरून वहात आहेत. विदर्भातील काही जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. लोणावळ्यात भूशी धरण पूर्ण भरून वहात आहे. पालघर जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील अनंतवाडी गावाला पुराचा वेढा पडला आहे. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील चिखलोली धरण पूर्ण भरले आहे. प्रसिद्ध गोसीखुर्द धरणाचे १४ दरवाजे उघडण्यात आले आहेत. भंडारा जिल्ह्यात ‘यलो अलर्ट’ची चेतावणी देण्यात आली आहे. महाबळेश्वरमध्ये गेल्या पाच दिवसांत १ सहस्र मिलीमीटर पाऊस झाला आहे.
विदर्भात काही भागांत शेती पिकांची मोठी हानी झाली आहे. बुलढाणा येथे पुराचा फटका बसला आहे. यवतमाळ, नांदेड येथे अतीवृष्टीचा फटका बसला आहे. १२ गावांचा संपर्क तुटला आहे. यवतमाळ येथील २८० नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. असंख्य नागरिकांची व्यवस्था निवारागृहात करण्यात आली आहे. वाशिम जिल्ह्यात शेतीची मोठी हानी झाली आहे. पुराच्या पाण्याने पिके वाहून गेली आहेत.
पुढील आठवडाभर मुंबईसह देशभरात पावसाचा जोर कायम रहाणार आहे. मुंबईसह ठाणे, कल्याण या भागांमध्ये मागील २४ घंट्यांमध्ये विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. शहरांत रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणार्या तलावांत ४८ टक्के पाणीसाठा झाला आहे. ७० टक्के पाणीसाठा झाल्यावर पाणीकपात रहित होईल.