कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता : प्रशासनाच्या सतर्कतेच्या सूचना !
राधानगरी धरण विसर्ग पातळीजवळ !
सातारा – जिल्ह्यातील कोयना धरणात सध्या ४६.७६ टी.एम्.सी. पाणीसाठा आहे. |
कोल्हापूर – जिल्ह्यात सातत्याने होत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील स्थिती गंभीर होत आहे. कोल्हापूर-गगनगिरी, तसेच कोल्हापूर-आंबोली मार्ग बंद असल्याने कोकणात जाण्यासाठीचा मार्ग बंद झाला आहे. पंचगंगा नदी आता इशारा पातळीच्या (३९ फूट) जवळ पोचत आली असून आज पंचगंगा नदीची पातळी ३८ फूट नोंदवली. प्रत्येक दिवस जिल्ह्यातील एकेका गावातील मार्ग आणि राज्यमार्ग बंद होत आहेत. पंचगंगा नदीला जर मोठ्या प्रमाणात महापूर आला, तर कोल्हापूरचा संपर्क चारही बाजूने तुटतो आणि कोल्हापूरची स्थिती बेटासारखी होते. पंचगंगा नदीचे पाणी वाढत असल्याने शहराला पाणीपुरवठा करणारी यंत्रणा पाण्याखाली गेल्यास कोल्हापूर शहरात पाणीपुरवठा करणारी यंत्रणा ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
१. वेदगंगा नदीच्या पाणीपात्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून निपाणी-देवगड रस्त्यावर मुरगुड नजिक पाणी आल्याने तेथून चालू असलेली वाहतूक बंद झाली आहे.
२. राधानगरी धरण ७७ टक्के भरले असून पाणी आता स्वयंचलीत द्वारांजवळ पोचले आहे. त्यामुळे आता धरणातून कधीही विसर्ग चालू होऊ शकतो, अशी स्थिती आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील ७५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
३. पंचगंगेची वाढती पातळी लक्षात घेऊन कोल्हापूर महापालिका प्रशासनाने सुतारमळा येथील नागरिकांनी दक्षता घ्यावी आणि आवश्यकता असल्यास स्थलांतरित व्हावे, असे आवाहन केले आहे.
४. कर्नाटकातील हिप्परगी बंधार्याचे द्वार खुले करण्यास कर्नाटक सरकारने विलंब केला. यामुळे कोल्हापुरातील पंचगंगा नदीचे पाणी वाढत आहे. हे लक्षात आल्यावर जलसंपदा विभागाने कर्नाटक सरकारकडे पाठपुरावा केल्यावर हिप्परगी धरणाचे द्वार खुले करण्यात आले आहे. यामुळे आता काही प्रमाणात पाणी वहाते झाले आहे.
५. नदीला आलेल्या पुरामुळे प्रयाग संगमावरील दत्त मंदिरासह सर्व मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. प्रयाग चिखली आणि आंबेवाडी गावात ‘एन्.डी.आर्.एफ्.’च्या पथकाने प्रात्यक्षिके केली असून निवडक लोकांना प्रशिक्षण दिले आहे, तसेच ग्रामपंचायतीने ग्रामस्थांना पूरपरिस्थितीमध्ये बाहेर आसरा घेण्यासाठी नोटीस बजावली आहे.
६. सांगलीत मात्र कृष्णा नदीचे पाणी न्यून होत असून २३ जुलैला आयर्विन पूल येथे पाणीपातळी केवळ १० फूट ९ इंच इतकी नोंदवली गेली. आलमट्टी धरणाच्या पाण्यातही सातत्याने वाढ असून धरणात सध्या ५३ टी.एम्.सी. पाणीसाठा आहे.
७. प्रशासनाच्या वतीने ९२०९२६९९९५ हा ‘हेल्पलाईन’ क्रमांक घोषित केला आहे. हा क्रमांक नागरिकांनी संरक्षित करून ठेवावा. यावर प्रशासनाच्या वतीने सूचना देण्यात येतील.