श्रीक्षेत्र नृसिंहवाडी (जिल्हा कोल्हापूर) येथे दक्षिणद्वार सोहळा !
नृसिंहवाडी (जिल्हा कोल्हापूर) – कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे २३ जुलैला दुपारी १ वाजता पहिला दक्षिणद्वार सोहळा मोठ्या उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात पार पडला. या वेळी अनेक भाविकांनी नदीत स्नान करून याचा लाभ घेतला. दत्त मंदिर पाण्याखाली गेल्याने मंदिर समितीकडून सर्व साहित्य सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. मंदिर पाण्याखाली गेले, तरी भाविकांसाठी अन्नछत्रातील प्रसाद मात्र चालूच रहाणार आहे.
दक्षिणद्वार सोहळा म्हणजे काय ?
श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर पूर्वाभिमुख असून दत्त मंदिरासमोर वहाणारी कृष्णा नदी उत्तर दिशेकडून दक्षिण दिशेकडे वहाते. जेव्हा कृष्णा नदीचे पाणी वाढते, तेव्हा हे पाणी मुख्य मंदिराच्या उत्तरद्वारातून मुख्य गाभार्यात प्रवेश करून श्रींच्या मनोहर पादुकांना स्पर्श करून मंदिराच्या दक्षिणद्वारातून बाहेर पडते. यालाच दक्षिणद्वार सोहळा असे म्हणतात.