संस्कृती आणि धर्म यांवर आघात होतात, तेव्हा भगवंत अवतार घेतातच ! – प.पू. माताजी स्थितप्रज्ञानंद सरस्वती
अहिल्यानगर – संस्कृती आणि धर्म यांवर आघात होतात, तेव्हा संस्कृती अन् धर्म यांच्या रक्षणार्थ भगवंत अवतार घेतात. हेच श्रीकृष्ण आणि श्रीराम यांनी आपल्या अवतार कार्यामधून दाखवून दिले, असे मार्गदर्शन प.पू. माताजी स्थितप्रज्ञानंद सरस्वती यांनी केले. येथील बडीसाजन मंगल कार्यालयात ‘झंवर परिवारा’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्रीरामकथा ज्ञानयज्ञाचे दुसरे पुष्प गुंफतांना त्या मार्गदर्शन करत होत्या. गणेश झंवर यांनी त्यांचे स्वागत केले.
प्रा. मधुसूदन मुळे प्रास्ताविक करतांना प.पू. माताजी यांच्याविषयी म्हणाले की, ६ वर्षांची बालिका गुरूंना भेटण्याचा हट्ट करते आणि फुलगावच्या श्रुतिसागर आश्रमातील तेजस्वी स्वामीजींचे दर्शन घेतांना ‘मला सद़्गुरु भेटले’, असे म्हणत आश्रमातच रहाण्याचा निर्णय घेते. स्वामीजीही ‘साक्षात् भगवती आली मी नाही कसे म्हणू ?’, असे म्हणत जिचे स्वागत करतात. त्याच प.पू. माताजी भगवान श्रीरामाचे चरित्रगान करत आहेत. माताजींनी मुण्डकोपनिषद, ईशावास्योपनिषद, कठोपनिषद, प्रश्नोपनिषद, मूलमंत्र, त्याचा अर्थ, शांकरभाष्य ओघवत्या भाषेत शास्त्रशुद्ध लिहिले. माताजी आणि स्वामीजींचे ग्रंथ येथे स्टॉलवर उपलब्ध होते. त्या ग्रंथसंपदेचा भाविकांनी लाभ घेतला.