शेतकर्‍यांविषयी दिलेला अहवाल खोटा निघाल्‍यास सुनील केंद्रेकर यांच्‍यावर गुन्‍हा नोंद करा ! – संजय शिरसाट, आमदार

आमदार संजय शिरसाट आणि सुनील केंद्रेकर

छत्रपती संभाजीनगर – माजी विभागीय आयुक्‍त सुनील केंद्रेकर यांनी मराठवाड्यातील शेतकर्‍यांविषयी शासनाला सादर केलेल्‍या अहवालावर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रश्‍नचिन्‍ह उपस्‍थित केले आहे. ‘हा अहवाल जर खोटा ठरल्‍यास केंद्रेकर यांच्‍यावर गुन्‍हा नोंद केला पाहिजे, असे त्‍यांनी २२ जुलै या दिवशी पत्रकारांशी बोलतांना स्‍पष्‍ट केले.

शेतकरी आत्‍महत्‍या हा चिंतेचा विषय आहे. या आत्‍महत्‍या थांबवण्‍यासाठी सुनील केंद्रेकर यांनी मराठवाड्यातील ८ जिल्‍ह्यांतील १० लाख शेतकर्‍यांचे एक सर्वेक्षण केले होते. ज्‍यात ‘एक लाखांहून अधिक शेतकर्‍यांच्‍या मनात आत्‍महत्‍या करण्‍याचा विचार चालू आहे’, असा अहवाल सरकारला देण्‍यात आला आहे. हा अहवाल समोर आल्‍यानंतर त्‍याचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटले आहेत.

ते पुढे म्‍हणाले की, सुनील केंद्रेकर यांनी अत्‍यंत चुकीचा अहवाल सादर केला आहे. त्‍यांनी जो अहवाल दिला आहे, त्‍यावरून संताप आला आहे. या अहवालाची चौकशी करा, जर तो खरा असेल, तर त्‍यानुसार कारवाई केली पाहिजे. जर तो चुकीचा अहवाल असेल, तर शेतकर्‍यांना आत्‍महत्‍येसाठी प्रवृत्त करणारा हा अहवाल असल्‍याने त्‍यांच्‍यावर गुन्‍हा नोंद केला पाहिजे. मी मुख्‍यमंत्र्याकडे याविषयी मागणी केलेली आहे. विभागीय आयुक्‍त म्‍हणून तुमचे काही दायित्‍व नव्‍हते का ? शेतकरी उभा कसा राहील ?, याकडे लक्ष द्या. शेतकरी आत्‍महत्‍या कसे करतात, याकडे तुमचे लक्ष आहे का ? तुम्‍ही राजकीय व्‍यक्‍तीसारखे प्रतिक्रिया आणि अहवाल देत आहात. त्‍यामुळे त्‍यांना त्‍यांची जागा दाखवली जाईल. सुनील केंद्रेकर यांच्‍या विरोधात ‘ईडी’ची चौकशी चालू आहे.