मणीपूरमधील अशांतता – मैतेई समाजाची सामाजिक, धार्मिक, राजकीय मानसिकता !
सध्या मणीपूरमध्ये चालू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर विशेष लेख
गेले २ मास मणीपूर हिंसाचाराच्या भीषण वणव्यात होरपळत आहे. वैष्णव हिंदु मैतेई आणि ख्रिस्ती कुकी समाज यांच्यात उसळलेला हा संघर्ष आहे. खरे तर हा संघर्ष मांडणे, हे एक-दोन लेखात शक्य नाही, तर यासाठी एखादे पुस्तक लिहावे लागेल, असा हा विषय मोठा आणि किचकट आहे; पण त्यातून मध्यम मार्ग, म्हणजे न्यूनतम शब्दांत एका पाठोपाठ एक असे काही लेख लिहिणे. त्या शृंखलेतील हा पहिला लेख.
सध्याच्या मणीपूरमधील अशांततेचे विश्लेषण इंफाळ उच्च न्यायालयाच्या पार्श्वभूमीवर करून काहीही साध्य होणार नाही; कारण उच्च न्यायालयाचा निकाल केवळ एक निमित्त आहे. खरी कारणे मैतेई आणि कुकी समाजाची धार्मिक, सामाजिक, भौगोलिक, राजकीय अन् आर्थिक स्थिती, तसेच त्याला धरून दोन्ही समाजांनी घेतलेल्या भूमिका यात लपलेले आहे. मैतेई वैष्णव हिंदु आहेत. ब्रिटीशकालीन भारतामध्ये मणीपूर संस्थान इतर अन्य संस्थानांसारखेच एक संस्थान होते आणि स्वतंत्र भारतात २१ सप्टेंबर १९४९ ला त्याचे अन्य संस्थानांप्रमाणे विलीनीकरण झाले. विलीनीकरणावर मणीपूरचे महाराज बोध चंद्र शर्मा, भारत सरकारचे अधिकारी व्ही.पी. मेनन आणि आसाम सरकारचे श्री. प्रकाश यांनी स्वाक्षर्या केल्या.
(भाग १)
१. मैतेई फुटीरतावादाचा प्रारंभ
‘मणीपूरचे विलीनीकरण अमान्य आहे आणि मणीपूर स्वतंत्र देश असला पाहिजे’, या भावनेतून २४ नोव्हेंबर १९६४ या दिवशी अरियमबाम समरेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली ‘युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंट’ (यू.एन्.एल्.एफ्.) या संघटनेची स्थापना झाली. पुढे त्यांनी तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानशी संबंध निर्माण करून सैन्य प्रशिक्षण आणि शस्त्र पुरवठा यांविषयी बोलणी चालू केली. वर्ष १९७५ मध्ये एन्. बिशेस्वर सिंह यांच्या नेतृत्वाखाली १६ मैतेई नेते ल्हासा मार्गे चिनी नेत्यांना भेटून संबंध मजबूत करण्याची प्रक्रिया चालू झाली. चिनी नेत्यांनी मैतेई नेत्यांची मिझो आणि नागा आतंकवादी गटांशी युती करून दिली.
२. भारतापासून स्वातंत्र होण्यासाठी ‘मैतेई-कुकी-नागा आतंकवादी गटां’ची महायुती
२२ मे १९९० या दिवशी ‘मैतेई आतंकवादी संघटना’, ‘कुकी नॅशनल आर्मी’, नागांचा ‘एन्.एस्.सी.एन्.-खापलांग गट’ आणि तेव्हाची शक्तीमान अशी आसामची ‘उल्फा’, या आतंकवादी गटांनी एकत्र येऊन ‘पॅन मोंगोलॉईड को-अॅलीशन’ म्हणून ‘इंडो-बर्मा (भारत-म्यानमार) रिव्होल्यूशन फ्रंट’ची स्थापना केली. या आघाडीचे उद्दिष्ट ‘इंडो-बर्मा भागाला, थोडक्यात आपण आता ज्याला ‘नॉर्थ ईस्ट’ (पूर्वोतर भारत) म्हणतो, तो भाग स्वतंत्र करण्यासाठी सशस्त्र संघर्ष करणे,’ हे होते.
मैतेई आतंकवादी संघटना ‘यू.एन्.एल्.एफ्.’ पाकिस्तानी सैन्याच्या साहाय्याने बांगलादेशात चट्टग्राम भागात आणि चिनी सैन्याच्या साहाय्याने म्यानमारमध्ये स्वतःचे तळ चालवायची. यामुळे स्वाभाविकपणे जिहादी पाकिस्तान आणि साम्यवादी चीन यांच्या तालावर नाचणे ओघाने आलेच. यामुळेच मैतेई आतंकवादी गटांनी वर्ष १९७१ मधील ‘बांगलामुक्ती’ युद्धात पाकिस्तानी सैन्याला सक्रीय सहकार्य केले होते !
३. ‘मैतेई म्हणजे हिंदू नव्हेत’, हा धार्मिक विभाजनवाद
जशा उर्वरित भारतात चर्च प्रायोजित शिवधर्म (मराठा समाज), लिंगायत धर्म (कर्नाटकमधील लिंगायत) आणि देशभरात अनेक ठिकाणी स्थानिक जातींना पूजा-पद्धतीच्या आधारावर व्यापक हिंदु धर्मापासून तोडण्याचे कारस्थान होत आहे, याचा एक प्रयोग चर्चने आधी मणीपूरमध्ये केला. ‘आम्ही मैतेई भारतीय नाही, तर मणीपुरी आहोत आणि मैतेई वैष्णव आहोत, हिंदु नाही’, असा हा विभाजनवाद होता.
मैतेईंना भारतियत्व आणि हिंदू यांच्यापासून तोडून शेवटी चर्चच्या गोठ्यात नेऊन बांधण्यासाठी हा खटाटोप होता. त्याखेरीज पूर्वोत्तर भारत हा जागतिक राजकारणात स्वतःचे वर्चस्व स्थापित करण्याच्या दृष्टीने एका अत्यंत मोक्याच्या जागेवर असल्याने तो एका ‘ग्रेट गेम’चा ((Great Game East: India, China and the Struggle for Asia’s Most Volatile Frontier – by Bertil Lintner – भारत, चीन आणि आशियातील सर्वांत अस्थिर सीमारेषेसाठी संघर्ष – लेखक : बेट्रिल लिंटनेर) महत्त्वाचा भाग होता.
४. चीन, पाकिस्तान, म्यानमार आणि चर्च यांचा मणीपूरमधील संघर्षात सहभाग
दलाई लामांना भारताने राजकीय आश्रय दिल्यानंतर त्याचा वचपा काढण्यासाठी, दक्षिण पूर्व आशियातील नैसर्गिक साधन संपत्तीने संपन्न विविध देशांना स्वतःच्या कह्यात ठेवण्यासाठी चीन इथे स्वतःचा जम बसवण्यासाठी मणीपूरमध्ये नवनवीन राष्ट्रीय भावना जन्माला घालत होता. दुसरीकडे चीन-रशिया यांना तेव्हा ऐनभरात असलेल्या शीतयुद्धामध्ये शह देण्यासाठी अमेरिका ‘बाप्टिस्ट’ आणि ‘प्रेसबिटेरियन’ चर्चेस यांना हाताशी धरून नवी सामाजिक अन् राजकीय ओळख निर्माण करत होती.
म्यानमार आणि मणीपूरच्या कुकी अन् नागा गटांना (खापलांग) बाप्टिस्ट, प्रेसबिटेरियन चर्च, तर त्याच वेळी मैतेई गटांना कॅथॉलिक चर्च पैसा पुरवत होते ! या सगळ्यांना चिनी साम्यवादी आणि पाकिस्तान म्यानमारच्या माध्यमातून शस्त्रपुरवठा करत ! वर्ष १९७१ मध्ये भारताने पाकिस्तानचे विभाजन घडवून आणण्याचा सूड उगवण्यासाठी उतावीळ पाकिस्तान नव्याने निर्माण झालेल्या बांगलादेशात परत एकदा या गटांना साहाय्य करण्यासाठी सरसावून पुढे येत होता. अमली पदार्थ आणि शस्त्र तस्करी यांच्या आधारावर हे गट हळूहळू आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने पुढे जात होते अन् त्याच वेळी यातून आपापल्या जाती भौगोलिक महत्त्वाकांक्षा नवे संघर्ष निर्माण करत होत्या.
५. मैतेई आणि ग्रेटर नागालँड
सध्याच्या नागालँडचे क्षेत्रफळ १६ सहस्र चौरस कि.मी. आहे आणि नागा संघटनांना अन् नागा बॅप्टिस्ट चर्च यांना जो स्वप्नातील ‘नागालँड फॉर ख्राईस्ट’ सिद्ध करायचा आहे, त्याचे क्षेत्रफळ ८० सहस्र चौरस कि.मी. आहे. यात संपूर्ण नागालँडखेरीज आसाम, अरुणाचल आणि म्यानमार यांच्याकडील नागाबहुल भाग समाविष्ट होतो. याला ते ‘ग्रेटर नागालँड’ किंवा ‘नागालीम’ म्हणतात.
६. वर्ष २००१ मध्ये मणीपूरमध्ये उसळलेला आगडोंब आणि त्याची पार्श्वभूमी !
‘नॉर्थ ईस्ट’मधील (पूर्वोत्तर भारतातील) सर्वांत शक्तीशाली आणि संघटित आतंकवादी गट आहे ‘एन्.एस्.सी.एन्. (आय.एम्.) इसाक चिसी सु’ आणि ‘थुइंग्लेन्ग मुईवा.’ ‘एन्.एस्.सी.एन्.- इसाक, मुईवा आणि भारत सरकार यांच्यात बँकॉक आणि थायलंडमध्ये चर्चा होत असत.
अशाच चर्चेच्या वेळी १४ जून २००१ या दिवशी स्वाक्षरी झालेल्या ‘बँकॉक अकॉर्ड’च्या अंतर्गत दोन्ही बाजूंमध्ये युद्धबंदी वाढवण्यासंदर्भात करार झाला. लालकृष्ण अडवाणी केंद्रीय गृहमंत्री असतांना युद्धबंदीच्या वार्षिक मुदतवाढीच्या ‘बँकॉक अकॉर्ड’च्या कालावधीत काही सरकारी बाबूंनी तत्कालीन वाजपेयी सरकारची दिशाभूल केली आणि सध्याच्या नागालँडच्या भौगोलिक सीमांच्या पलीकडे सर्वत्र भारतीय सेना आणि इसाक-मुईवा गटातील युद्धबंदी वाढवली. याचा अर्थ आता भारतीय सैन्य संपूर्ण पूर्वोत्तर भारतात कुठेही इसाक-मुईवा गटाच्या नागा आतंकवाद्यांविरुद्ध सैनिकी कारवाई करू शकत नव्हते. या निर्णयाचे मणीपूरमध्ये लगेच आणि भीषण पडसाद उमटले.
‘इसाक-मुईवा समवेतची युद्धबंदी मणीपूरमध्येही असेल आणि यापुढे नागा आतंकवादी इंफाळ खोर्यातील मैतेई समुदायालाही त्रास देतील, ‘ग्रेटर नागालँड’मध्ये मणीपूरचा समावेश करण्याला वाजपेयी सरकारने दिलेली ही अप्रत्यक्ष मान्यता आहे आणि आधीच मणीपूर राज्याच्या केवळ १० टक्के क्षेत्रफळात जी ६५ टक्के लोकसंख्या रहाते, तेथूनही मैतेई हिंदूंना नागा आतंकवादी हुसकावेल’, वगैरे चिंतांनी मणीपूरमध्ये उद्रेक झाला. वर्ष १९९२ मध्ये नागांनी केलेल्या कुकींच्या भीषण हत्यांच्या आठवणीने मणीपूरमधील हिल्स भागात रहाणारे कुकीही संतापले आणि अख्खा मणीपूर पेटला. मणीपूर विधानसभा जाळून खाक केली गेली, सरकारी संपत्तीची जाळपोळ करण्यात आली, तसेच हत्या, गोळीबार, सहस्रो नागरिकांची प्रचंड निदर्शने आणि सैन्य-पोलीस यांच्यावरील आक्रमणे, यांमुळे राज्यात अशांतता पसरली. ज्या कुणी ही कल्पना केंद्र सरकारला सुचवली असेल, त्याचा निश्चितपणे भूमीशी काहीही संबंध नव्हता. या हिंसाचाराच्या आगीत कित्येक लोक मारले गेले. अंततः २७ जुलै २००१ या दिवशी केंद्र सरकारने स्वतःचा निर्णय मागे घेतला.
७. सध्याचा मैतेई- कुकी संघर्ष आणि त्यामागील कारण
वर उल्लेख केल्याप्रमाणे मणीपूरच्या एकूण लोकसंख्येत ५३ टक्के लोकसंख्या मैतेईंची असली, तरी ते इंफाळ-थौबल भागात मणीपूरच्या एकूण आकाराच्या केवळ १० टक्के भागात वेगवेगळ्या मैतेईतेर समुदायांसमवेत रहातात. त्यामुळे मणीपूरची एकूण ६५ टक्के लोकसंख्या इंफाळ, थौबल, काकचिंग आणि बिष्णुपूर या भागात केवळ १० टक्के क्षेत्रफळात रहाते.
मैतेई समुदाय अनुसूचित जमाती (Scheduled Tribe) प्रकारात मोडत नाही. त्यामुळेच मैतेई आपल्या घनदाट लोकसंख्येतून बाहेर पडून मणीपूरमधील कुकी, तांखुल नागा आणि अन्य अनुसूचित जमातींच्या डोंगराळ भागांत जाऊन भूमी खरेदी करू शकत नाहीत; पण कुकी, नागा अन् अन्य अनुसूचित जमाती समुदाय मात्र आधीच गच्च भरलेल्या आणि अन्य भागांपेक्षा जरा अधिक विकसित असलेल्या इंफाळ भागात येऊन भूमी खरेदी करू शकतात. याचा सामाजिक, आर्थिक आणि मानसिक दुष्परिणाम मैतेई समाजावर होतो.
यातून मार्ग काढण्यासाठी ‘गेल्या २० वर्षांपासून मैतेईंना अनुसूचित जमातीचा दर्जा मिळावा’, अशी मागणी चालू झाली. वर्ष २०१३ मध्ये यासंदर्भात इंफाळ उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट झाली आणि त्या याचिकेच्या सुनावणीच्या वेळी ३ मे २०२३ या दिवशी न्यायालयाने मणीपूर राज्य आणि केंद्र सरकार यांना ‘मैतेई समाजाला अनुसूचित जमातीत (ट्रायबल स्टेटस) समाविष्ट करण्याच्या संदर्भात’ नोटीस बजावून ३० मे २०२३ पर्यंत निर्णय घेण्याचा आदेश दिला.
‘मणीपूरमधील राजकारणात आणि सरकारी व्यवस्थेत मैतेई आधीपासून प्रबळ आहेत अन् आता त्यांना अनुसूचित जमातीचा दर्जा मिळाला, तर ते हिल्स भागातही येतील आणि आमच्यावर अन्याय होईल’, अशी भावना कुकी समाजात बाप्टिस्ट-प्रेसबिटेरियन चर्च अनेक वर्षांपासून पेरत आहेत. न्यायालयाच्या निर्णयाने याचा भडका उडाला आणि सध्या कुकी भागातून यच्चयावत् सगळे मैतेई अन् मैतेई भागातून बहुतांश कुकी हे विस्थापित झाले. गेल्या ३ मासांत अभूतपूर्व हिंसाचार, तसेच जीवित आणि वित्त यांची हानी झाली आहे.
सध्याच्या हिंसाचारानंतर मैतेई समाजाचा जो वर्ग (अर्थात्च असा वर्ग बहुसंख्य कधीच नव्हता; पण प्रबळ नक्कीच होता) ‘आम्ही भारतीय नाही, आम्ही हिंदु नाही’, या मानसिकतेत होता, तो त्यातून आता हळूहळू बाहेर येत आहे. कुकींसाठी जगभरातील बाप्टिस्ट-प्रेसबिटेरियन चर्च ‘लॉबी’ जागतिक पातळीवर अतिशय आक्रमक प्रचार करत आहे आणि मैतेई समाजाला खलनायक ठरवत आहेत.
१२ जुलै २०२३ या दिवशी युरोपीयन संसदेमध्ये मणीपूर हिंसाचाराविषयी चर्चा झाली, इतका या ‘लॉबी’चा प्रभाव आहे. वास्तविक मैतेई संदर्भात न्यायालयाचा निर्णय आल्या आल्या ‘ट्रायबल सॉलिडॅरिटी मार्च’ काढून मणीपूरमधील पहाडी भागात चर्चने हिंसाचार भडकावला आणि त्याची मैतेईबहुल भागात नंतर प्रतिक्रिया उमटली; पण आज जागतिक स्तरावर मैतेई ‘हिंदु खलनायक’ ठरवले जात आहेत.
(क्रमशः पुढच्या सोमवारी)
– श्री. विनय जोशी, सामरिक शास्त्र विश्लेषक
(हा लेख श्री. विनय जोशी यांच्या ‘फेसबुक’ खात्यावरून घेतला असून त्यासाठी ‘सनातन प्रभात’ नियतकालिक समूह त्यांचा आभारी आहे. – संपादक)