प्रेमळ, सकारात्मक आणि कर्करोगासारख्या दुर्धर आजारातही तळमळीने साधना करणार्या उंचगाव (कोल्हापूर) येथील वैद्या सुश्री (कु.) सुजाता जाधव (वय ४१ वर्षे) !
‘वैद्या सुश्री (कु.) सुजाता जाधव यांना मी वर्ष १९९८ पासून ओळखतो. आम्ही जिल्ह्यातील विज्ञापनांचे संकलन आणि इतर विविध सेवा एकत्र केल्या आहेत. मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. प्रेमभाव
अ. सुजाताताई पुष्कळ प्रेमळ आहेत. ताईंनी नेहमी मोठ्या बहिणीप्रमाणे माझी काळजी घेतली. त्या मला नेहमी लहान भावाप्रमाणेच साहाय्य करतात.
आ. रात्री सेवेला उशिरापर्यंत थांबावे लागल्यास त्या मला एकट्याला घरी जाऊ देत नसत. मी त्यांच्या घरी मुक्काम करून सकाळी घरी जात असे.
२. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अपेक्षित अशी सेवा कशी करायची ?’, हे सुजाताताईंकडून शिकायला मिळणे
त्यांच्या समवेत सेवा करत असतांना मी महाविद्यालयीन शिक्षण घेत होतो. ‘सेवेचे दायित्व घेणे’ माझ्यासाठी नवीन होते. ‘दायित्व घेऊन सेवा कशी करायची ?’, हे मला त्यांच्याकडून शिकायला मिळाले. ‘प.पू. गुरुदेवांना अपेक्षित अशी सेवा कशी करायची ?’, हे त्यांनी मला शिकवले.
३. शिस्तप्रिय
‘सेवाकेंद्रात सेवेला वेळेत जाणे, सेवा ठरलेल्या कालावधीत पूर्ण करणे’, यांसाठी त्या प्रयत्न करत असत. ‘सेवेसाठी वापरलेल्या वस्तू वापरानंतर पुन्हा त्याच जागी ठेवणे’, हा त्यांचा गुणच आहे.
४. सुंदर आणि सात्त्विक अक्षर काढण्यास शिकवणे
त्यांचे अक्षर पुष्कळ सुंदर आहे. पूर्वी आम्ही गुरुपौर्णिमेला तक्ते बनवायचो. तेव्हा ‘त्यांनीच मला सुंदर आणि सात्त्विक अक्षरे कशी काढायची ?’, हे शिकवले.
५. तत्त्वनिष्ठतेने चुका सांगणे :
माझ्याकडून सेवेत एखादी चूक झाली, तर त्या अत्यंत तत्त्वनिष्ठतेने आणि प्रेमाने मला माझी चूक सांगत असत आणि माझ्याकडून सुधारणा करून घेत असत.
६. अल्प अहं
ताई स्वतः वैद्या आहेत; मात्र त्यांनी कधीही स्वतःचे वेगळेपण जपले नाही. त्यांचे वागणे अत्यंत सामान्य व्यक्तीप्रमाणे सहज आहे. मी त्यांच्यापेक्षा लहान आहे, तरीही ‘काही प्रसंगांमध्ये काय निर्णय घ्यावा ?’, याविषयी त्या माझ्याशी बोलायच्या.
७. रागाचा लवलेश नसणे
आम्ही अनेक वर्षे एकत्र सेवा केली; मात्र मी कधीही त्यांना चिडलेले किंवा रागावलेले पाहिलेे नाही. ‘समोरच्या साधकाची चूक झाली किंवा तो ऐकत नाही’, असे असले, तरी त्या त्याला शांतपणेच समजावून सांगत.
८. सुश्री (कु.) सुजाताताई यांना कर्करोग झाल्यानंतर जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये
८ अ. ऐकण्याची वृत्ती : शस्त्रकर्म झाल्यानंतर त्यांना खाण्या-पिण्याच्या संदर्भात बरीच पथ्ये होती; मात्र ताईंनी ती सहजतेने पाळली. त्यांनी खाण्या-पिण्याची कोणतीही आवड-नावड जोपासली नाही.
८ आ. इतरांचा विचार करणे
१. ताई त्यांच्यावरील शस्त्रकर्मासाठी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात यायच्या. तेव्हा मी माझ्या कुटुंबियांसह त्यांना भेटायला जायचो. त्या वेळी ‘आम्हाला घरी जायला उशीर होऊ नये’, यासाठी त्या ‘लवकर निघा’, असे सांगायच्या. माझे घर रुग्णालयापासून दूर होते. ‘मी तुमच्यासाठी डबा घेऊन येतो’, असे सांगितले, तरी त्या ‘डबा नको. तसेच भेटायला या’, असे मला सांगायच्या. त्या रुग्णालयातीलच जेवण ग्रहण करायच्या.
२. १८.७.२०२३ या दिवशी आम्ही ताईंच्या गावी त्यांची भेट घेऊन आलो. त्यानंतर ‘आम्ही घरी पोचलो का ?’, हे पहाण्यासाठी त्यांनी रात्री ११.१५ वाजता आम्हाला संपर्क केला.
८ इ. सहनशीलता : किमोथेरपी (कर्करोगावरील औषधप्रणाली) केल्यानंतर पुष्कळ शारीरिक त्रास होतात; मात्र ताईंनी एकदाही ‘मला त्रास होत आहे’, असे सांगितले नाही. शस्त्रकर्माच्या दुसर्या दिवशीही त्यांच्या चेहर्यावर त्रासाचा लवलेषही नव्हता; उलट रुग्णालयातून बाहेर पडतांना त्यांनी तेथील आधुनिक वैद्य आणि कर्मचारी यांना सनातनचे ग्रंथ अन् सात्त्विक उत्पादने भेट दिली.
८ ई. सकारात्मकता
१. ताईंवर आतापर्यंत १५ वेळा किमोथेरपी करण्यात आली. त्यांच्या प्रकृतीत विशेष पालट दिसत नव्हता; मात्र त्या स्थितीतही ताई पुष्कळ सकारात्मक होत्या. ‘काहीही झाले, तरी प.पू. गुरुदेवांच्या कृपेमुळे मी या स्थितीतून बाहेर पडू शकते’, अशी त्यांची श्रद्धा होती.
८ उ. साधनेची तळमळ : ‘कर्करोगातून बरे होऊन मला साधना आणि सेवा करायची आहे’, असे त्या नेहमी म्हणायच्या. रुग्णालयात भरती झाल्यानंतरही त्या व्यष्टी साधना आणि नामजपादी उपाय चिकाटीने करायच्या.
८ ऊ. भाव : ताईंचा प.पू. गुरुदेवांविषयी पुष्कळ भाव आहे. ‘कर्करोग झाल्यानंतर आलेल्या प्रत्येक परिस्थितीमध्ये परम पूज्य गुरुदेवांच्या कृपेमुळेच मी स्थिर, शांत आणि सुखरूप आहे’, असे त्या सतत सांगतात. ‘त्यांनी परिस्थिती स्वीकारली असून त्यांचे त्याविषयी देवाकडे कोणतेही गार्हाणे नाही’, असे मला जाणवले.
‘हे गुरुदेवा, ‘सुजाताताईंप्रमाणे प्रेमभाव, साधनेची तळमळ, आपल्या प्रतीचा उत्कट भाव इत्यादी गुण माझ्यातही येऊ देत’, ही आपल्या चरणी कळकळीची प्रार्थना !’
– एक साधक, पुणे (२०.७.२०२३)