…अशाने सह्याद्री पायथा निर्मनुष्य होईल !
इरशाळवाडी गावावर (जिल्हा रायगड) डोंगराचा काही भाग कोसळल्याच्या घटनेवर प्रकाश टाकणारा लेख
‘सह्याद्रीतील निसर्गरम्य गावांची ओळख ‘दरडग्रस्त’ होणे, हे दुर्दैवी आहे. २० जुलै २०२३ या दिवशी कोकणातील इरशाळवाडी गावावर (तालुका खालापूर, जिल्हा रायगड) डोंगराचा काही भाग कोसळून गावच्या गाव दरडीखाली गुडूप झाल्याची, तर काहींना प्राण गमवावे लागल्याची अत्यंत दुःखद घटना घडली आणि दरडी कोसळण्याच्या घटनेची भयानकता पुन्हा समोर आली. यातून भविष्यात सह्याद्री पायथा निर्मनुष्य होण्याचा धोका अधिक गडद झाला.
१. वृक्षतोडीमुळे गावे, जंगले आणि देवराई यांची होत असलेली दुःस्थिती !
सह्याद्री पर्वतात दरड कोसळणे, हे आता नित्याचे झाले आहे. मागील काही वर्षात हे प्रमाण कमालीचे वाढले असल्याचे आपण पहात आहोत. वाढती वादळे आणि त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम रोखण्यासाठी केंद्र अन् राज्य शासनाने १० सहस्र कोटी रुपयांचा आराखडाही सिद्ध केला. या आराखड्यानुसार कोकणातील १ सहस्र ५० गावे ‘दरडग्रस्त’ ठरली. पर्यटन समृद्ध असलेल्या कोकणातील समुद्रकिनार्यांसह सह्याद्रीतील निसर्गरम्य गावांची ओळख ‘दरडग्रस्त’ होणे दुर्दैवी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनार्यावर १०९, तर मंडणगड ते राजापूर या सह्याद्रीच्या पट्ट्यात ५०३ गावे आहेत. आपल्या पूर्वजांनी पोटाला चिमटे काढून येथील खासगी जंगल मालमत्ता जगवली आणि टिकवली.
वृक्षतोडीमुळे येथील गावे, जंगले आणि देवराई (देवाच्या नावाने राखलेले अन् पवित्र समजले जाणारे वन) यांची आजची स्थिती भयावह आहे. आपल्या देवरायांना किमान २ सहस्र वर्षांचा वारसा आहे. आपण वृक्षकोश पडताळला, तर आपल्या देवरायांतील अनेक झाडांची उपज ही आशिया खंडातील असल्याचे लक्षात येते. ‘२ सहस्र वर्षांपूर्वी ही झाडे तिकडून इकडे कशी आली असतील ?’, असा प्रश्न निर्माण होतो. नंतरच्या काळात आध्यात्मिक प्रभावामुळे ही वृक्षराजी बहरली. तिच्यात मंदिरे उभी राहिली. पेशवाई संपुष्टात येईपर्यंत आपल्या देवराया पूर्वजांकडून सांभाळलेल्या होत्या. ब्रिटिशांनी भारतीय देवरायांचे वर्णन ‘वृक्षांचा महासागर’ असे केले होते. विविध कारणांनी ब्रिटिशांच्या काळात देवराया आणि जंगले यांची अधिकची तोड चालू झाली अन् ती आजही चालू आहे. तिचे परिणाम आपण अनुभवतो आहोत.
२. सध्याचा विकास केवळ वृक्षतोड आणि स्थलांतरित करणे यांचा पर्याय देणारे
इरशाळवाडी घटनेच्या वार्तांकनात आपण सातत्याने निसर्गाला दोष लावणारी विधाने ऐकली. ‘प्रत्येक चांगल्या-वाईट घटनेची अचूक पूर्वकल्पना देणारा निसर्ग दोषी कसा ?’, असा प्रश्न उपस्थित होतो. मला जाणवलेले दुसरे वास्तव सर्वांत भयंकर आहे. अशा दरड दुर्घटनाग्रस्त ठिकाणी रहाणार्या लोकांचे शहरातील नातेवाइक हे गावातील भूमी सोडून सरकारकडून शहराला लागून असलेल्या ठिकाणच्या भूमी मिळवून स्थलांतरित होण्याच्या तीव्र विचारात आहेत. त्यासाठी ते गावातील आपल्या बांधवाना अतीआग्रह करायलाही मागे-पुढे पहात नाहीत, हे वास्तव आहे. गावातील माणूस सहसा गाव सोडायला सिद्ध होत नाही. अशांसाठी सध्याच्या विकास प्रक्रियेने जणू २ पर्यायच सिद्ध केले आहेत. पहिला म्हणजे वृक्षतोडीचा, म्हणजेच हळूहळू सगळे पायथे रिकामे करण्याचा ! आणि दुसरा विकासाचा थेट ‘परशुराम घाट’ बनवण्याचा ! दोन्ही विषयात आज ना उद्या सह्याद्रीतील पायथ्याला रहाणार्या मूळ निवासी बांधवांना अनेच्छेने का होईना; पण स्थलांतरित व्हावे लागेल, असा आमचा सध्याचा विकास आहे.
३. दुर्घटनेच्या घटना मनुष्याने विकासाच्या अतीहव्यासापोटी निसर्ग ओरबाडल्यामुळेच !
सह्याद्रीतील जंगलांची बेसुमार तोड करणारे कुणीही पायथ्याला रहात नाहीत. जे रहातात, त्यांच्या वंशजांनी ही जंगले टिकवली आहेत. आजची बेसुमार वृक्षतोड मानवी मुळावर आलेली आहे; मात्र तिचे सध्याचे रूप आम्हाला सह्याद्रीपासून दूर नेण्याचा धोका आहे. ऐन वर्षा ऋतूत सह्याद्रीच्या दर्या-खोर्यात, धबधब्यांवर उत्तरदायित्वाने फिरायलाही बंदी होत असेल, तर आम्ही नक्की कसला विकास साधत आहोत ? मनुष्याने विकासाच्या अतीहव्यासापोटी निसर्ग ओरबाडून काढल्याने इरशाळवाडीसारख्या घटना सातत्याने घडत राहून भविष्यात सह्याद्री पायथा निर्मनुष्य होणार आहे.
– श्री. धीरज वाटेकर, मुक्त पत्रकार आणि पर्यावरण अभ्यासक, चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. (२०.७.२०२३)
(श्री. धीरज वाटेकर यांच्या ‘ब्लॉग’वरून हा लेख घेतला असून त्याबद्दल ‘सनातन प्रभात’ नियतकालिक समूह त्यांचा आभारी आहे. – संपादक)