१५ दिवसांत समस्या मार्गी न लागल्यास ‘रास्ता रोखा’आंदोलन

शिवसेना ठाकरे गटाचे राष्ट्रीय महामार्ग विभागाला निवेदन

चिपळूण – गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाच्या कामाची प्रगती चांगली असली, तरी तालुक्यातील कोंडमळा, सावर्डे, असुर्डे, वहाळफाटा अशा ठिकाणी सर्वसामान्य स्थानिक नागरिक आणि वाहनचालक यांना अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्या तात्काळ निकाली काढणे आवश्यक आहे. येत्या १५ दिवसांत समस्या मार्गी न लागल्यास ‘रास्ता रोखा’ आंदोलन करण्याची चेतावणी शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागास निवेदनाद्वारे दिली आहे.

हे निवेदन देतांना विभागप्रमुख संदीप राणे, माजी सरपंच सुनील गुरव, उपविभागप्रमुख रमेश राजेशिर्के, रणजीत घाणेकर आणि अन्य सहकारी उपस्थित होते.

या निवेदनामध्ये म्हटले आहे की, कोंडमळा येथे भुयारी मार्ग बंद असल्याने, तसेच रस्त्याचे काम अपूर्ण असल्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होते. महामार्ग ओलांडून महिलांना पाणी आणण्यासाठी जावे लागते. याशिवाय शेतकरी, जनावरे, विद्यार्थी, तसेच बाजारपेठ आणि रेशन दुकानावर ये-जा करतांना महामार्गाचा अडथळा निर्माण होत आहे. येथे वारंवार अपघातही घडले आहेत.

ग्रामस्थांनीही वारंवार तक्रारी केल्या, तरी त्याची दखल घेतली जात नाही. भविष्यात अपघात घडल्यास संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यासाठी उत्तरदायी रहातील. कोंडमळा पूल ते सीमेचीवाडी येथे आर्.सी.सी. गर्डर महामार्गावरती ठेवून रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे रस्त्यावर वारंवार अपघात होत आहेत. अपघातात दोन व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे. यास उत्तरदायी असलेल्या अधिकारी आणि ठेकेदारावर गुन्हा नोंद करण्याची मागणी केली आहे.

ईगल आस्थापनाने सीमेचीवाडी येथे नदीच्या बाजूला मातीचा मोठा भराव केला आहे. त्यामुळे नदीचा प्रवाह पालटून तो शेतकर्‍यांच्या भूमींमध्ये जाऊन शेतकर्‍यांची आर्थिक हानी होत आहे. चर्मकारवाडी, बौद्धवाडी, तसेच स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता बंद झालेला आहे. या आस्थापनावर दंडात्मक कारवाई करून भराव काढून टाकावा. यांसह महामार्गालगतच्या गावांना भेडसावणार्‍या समस्या सोडवण्याची मागणी करण्यात आली.