आंबा आणि काजू उत्पादक शेतकर्यांच्या मागण्या पूर्ण करा !
आमदार डॉ. राजन साळवी यांचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना निवेदन
२५ जुलैच्या आत बैठकीचे आयोजन
राजापूर, २१ जुलै (वार्ता.) – कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्था मर्यादित, रत्नागिरी यांनी दिलेल्या पत्रानुसार आमदार डॉ. राजन साळवी कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकर्यांच्या मागणांविषयी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना निवेदन दिले.
या निवेदनाच्या माध्यमातून आमदार डॉ. राजन साळवी यांनी म्हटले आहे की, आंबा आणि काजू हे कोकणातील शेतकर्यांचे मुख्य पीक असून गेल्या काही वर्षांपासून अवकाळी पाऊस, वादळे अशा नैसर्गिक आपत्ती आणि पालटत्या वातावरणामुळे आंबा अन् काजू उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलेले आहेत. त्यामुळे सदर शेतकर्यांना शासनाच्या साहाय्याची आवश्यकता आहे. कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकर्यांच्या आर्थिक अडचणींचे निवारण होण्याच्या अनुषंगाने शेतकर्यांच्या मागण्यांविषयी सकारात्मक विचार होण्याची विनंती आहे.
आमदार डॉ. राजन साळवी यांनी दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सचिव डॉ. कामरे यांना तात्काळ २५ जुलैच्या आत या विषयाच्या बैठकीचे आयोजन करण्याच्या सूचना दिल्या.