जगातील ५० कोटी बौद्धांना आकर्षित करण्यासाठी जागतिक बौद्ध स्थळांच्या धर्तीवर देशात उभारण्यात येणार ‘बुद्धिस्ट सर्किट्स’ !

जागतिक स्तरावर ०.००५ टक्के बौद्धच भारतातील बौद्धांच्या धार्मिक स्थळांना देतात भेट !

(‘बुद्धिस्ट सर्किट’ म्हणजे गौतम बुद्ध यांनी भ्रमण केलेली सर्व ठिकाणे जोडणारी योजना !)

नवी देहली – गौतम बौद्ध यांचे कार्य प्रामुख्याने भारतात झालेले असतांनाही  जगभरातील ५० कोटी बौद्ध धर्मियांपैकी केवळ ०.००५ टक्के बौद्धच भारतात त्यांच्या धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी येतात. त्यामुळे बौद्धांना आकर्षित करण्यासाठी पर्यटन मंत्रालय त्याच्या धोरणात मोठा पालट करणार आहे. याअंतर्गत जागतिक बौद्ध स्थळांच्या धर्तीवर देशातील ‘बुद्धिस्ट सर्किट्स’ विकसित करण्यात येणार आहेत.

१. यांतर्गत चीन, थायलँड, जपान आणि म्यानमार या बौद्धबहुल देशांतील लोकांना भारतातील ‘बुद्ध सर्किट’ला भेट देता येण्यासाठी थेट विमानसेवा, तसेच ‘प्रीमियम रेल्वे’ चालू करण्यात येईल.

२. सर्व बौद्ध स्मारके, मंदिरे, शिलालेख आणि स्तंभ यांच्याविषयी माहिती देणारे फलक चिनी भाषेतील मँडेरिन, कँटोनीज, जपानी आणि थाई भाषेत असतील.

३. बौद्ध स्थळांवर ए.टी.एम्. चालू करण्यासाठी चिनी, जपानी आणि थायलँड येथील बँकांशी करार करण्याचीही चर्चा आहे.

४. बुद्धाचे जन्मस्थान लुंबिनी हे नेपाळ येथे आहे. त्याखेरीज त्यांच्या जीवनाशी संबंधित सर्व बौद्ध तीर्थक्षेत्रे भारतात आहेत. बुद्धाचे ज्ञानप्राप्तीचे ठिकाण ‘बोधगया’ (बिहार), पहिल्या प्रवचनाचे ठिकाण ‘सारनाथ’ (काशी, उत्तरप्रदेश), परिनिर्वाणाचे ठिकाण ‘कुशीनगर’ (उत्तरप्रदेश), प्रदीर्घ काळ उपदेशाचे ठिकाण ‘श्रावस्ती’ (उत्तरप्रदेश), तसेच बिहारमधील ‘राजगीर’ आणि ‘वैशाली’ हे भारतात आहेत.