गोव्यात २६ जुलैपर्यंत वादळी वार्यासह अतिवृष्टीची चेतावणी : तिलारी धरणातील पाणी सोडले
पणजी, २२ जुलै (वार्ता.) – हवामान विभागाने गोव्यात पुढील ५ दिवसांत सोसाट्याच्या वार्यासह अतिवृष्टीची चेतावणी दिली आहे. २३, २४, २५ आणि २६ जुलै यां दिवशी काही ठिकाणी मुसळधार पाऊस (२४ घंट्यांमध्ये ६४.४ मि.मी. पाऊस) ते अतिवृष्टी (२४ घंट्यांमध्ये ११५.५ मि.मी. पाऊस) होण्याची शक्यता आहे. पावसासह सुमारे ४० ते ५० कि.मी. प्रतिघंटा वेगाने वारे वहाण्याची शक्यता आहे. २२ आणि २३ जुलै यां दिवशी महाराष्ट्रातील रत्नागिरी अन् सिंधुदुर्ग जिल्हा आणि गोव्याच्या किनारपट्टीवर ४५-५५ कि.मी. प्रतिघंट्यापासून ६५ कि.मी. प्रतिघंटा वेगाने वार्यासह वादळी हवामानाची शक्यता आहे.
नद्यांतील पाणी धोक्याच्या पातळीखाली : जलस्रोत खात्याची माहिती
पणजी – जरी गोव्यात गेल्या काही दिवसांत मुसळधार पाऊस पडला असला, तरी येथील नद्यांतील पाणी धोक्याच्या पातळीखाली वहात आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे. जलस्रोत खात्याचे एक ज्येष्ठ अधिकारी म्हणाले, ‘‘तिलारी धरणातून पाणी सोडले जाण्याविषयी आमच्या खात्यातील अधिकारी महाराष्ट्रातील अधिकार्यांच्या संपर्कात आहेत आणि धरणावरील परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. म्हादई, खांडेपार, डिचोली, वाळवंटी आणि चापोरा येथील नद्यांची पाण्याची पातळी ही धोक्याच्या पातळीखाली आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. सावधगिरीचा उपाय म्हणजे नागरिकांनी कोणत्याही नदीच्या पाण्यात जाऊ नये; कारण नदीच्या पाण्याचा प्रवाह पुष्कळ जोरात आहे.’’
तिलारी धरणाचे पाणी सोडल्याने पेडणे तालुक्यातील शापोरा-तेरेखोल बैलपूर नदीला पूर आला आहे. यामुळे परिसरातील बागायतीत पाणी शिरले आहे.
गोव्यात २ सहस्र मि.मी.हून अधिक पाऊस
गोव्यात गेल्या २४ घंट्यांत सरासरी ९०.२ मि.मी. पावसाची नोंद झाली. पावसाने आता २ सहस्र मि.मी.चा टप्पा ओलांडला आहे आणि २०.५ टक्के अतिरिक्त पाऊस झाला आहे. सांखळीमध्ये सर्वाधिक १७१.६ मिमी पाऊस पडला. त्यानंतर पेडणे, म्हापसा, पणजी आणि काणकोण यांचा क्रमांक लागतो.