‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या काळात सेवा करतांना आलेल्या अनुभूती !
१. शौचालयाची स्वच्छता करतांना शौचालयात सनातन उदबत्तीने शुद्धी केल्यावर दुर्गंधी न्यून होणे
‘१३ ते २५.६.२०२३ पर्यंत मला गुरुकृपेने ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त सेवा करण्याची संधी मिळाली. तेव्हा तिथे मला सभागृह आणि शौचालय स्वच्छ करण्याची सेवा मिळाली. शौचालयात कितीही पाणी ओतले, तरी दुर्गंधी येत होती. प्रतिदिन मी देवाला प्रार्थना करत होतो. २०.६.२०२३ पासून मी शौचालयात सनातन उदबत्ती फिरवू लागलो. तसेच वास्तूशुद्धी करणारे साधक येऊन उदबत्ती लावून शुद्धी करत होते. त्याचा परिणाम म्हणजे दुर्गंधी येणे न्यून झाले.
२. शौचालयाची स्वच्छता करतांना लादीवर ॐ उमटलेला दिसणे
२१.६.२०२३ या दिवशी शौचालयाच्या लादीवर ‘ॐ’ उमटलेला दिसला. तो अर्धवट दिसत होता. तेव्हा मी देवाला विचारले, ‘देवा, हा ‘ॐ’ पूर्ण दिसत नाही. हा खरंच ‘ॐ’ आहे का ?’ तेव्हा सायंकाळी ७ वाजता शौचालयात लावलेल्या उदबत्तीच्या विभूतीमध्ये पूर्णाकृती ‘ॐ’ उमटला. ते पाहून माझी भावजागृती झाली. ‘चराचरात ईश्वर वास करतो’, याची अनुभूती घेता आली.
३. प्रतिदिन सकाळी रामनाथी मंदिरातील अभिषेक आणि देवपूजा पाहून भावजागृती होणे
गुरुकृपेने आमची निवासव्यवस्था रामनाथी देवस्थानातच होती. मी पहाटे उठून अंघोळ करून रामनाथी मंदिरात नामजप करण्यासाठी जात होतो. त्या वेळी सकाळी देवाला अभिषेक आणि देवपूजन होत असे. ते पाहून माझी भावजागृती होत असे.
४. हिंदुत्वनिष्ठांनी स्वच्छतेची सेवा देवाकडे पोचल्याचे सांगणे आणि त्यानंतर पुजार्यांनी मंदिरातील प्रसाद आणून देणे
२०.६.२०२३ या दिवशी एक हिंदुत्वनिष्ठ मंदिरात आले. ते मला पाहून म्हणाले, ‘‘तुमची सेवा देवाकडे पोचली आहे.’’ त्या वेळी माझ्या मनात विचार आला, ‘खरंच असे आहे का ?’, याची प्रचीती देवाने २३.६.२०२३ या दिवशी देतांना सकाळी मंदिरातील पुजार्यांनी देवाकडील प्रसाद आणून मला दिला. त्या वेळी भावजागृती होऊन मला आनंद झाला. ‘देवाच्या चरणी आपली सेवा पोचली’, असे वाटून मला आनंद झाला. तो प्रसाद स्वच्छता करणार्या सर्व साधकांना दिला. तेव्हा त्यांनाही आनंद झाला.
५. मंदिरात एका अनोळखी व्यक्तीने पाठीवरून हात फिरवल्यावर ‘संतांनी पाठीवरून हात फिरवला आहे,’ असे वाटणे
स्वच्छतेची सर्व सेवा आवरून मी दुपारी पुन्हा देवळात गेलो. तेव्हा देवाची आरती चालू होती. आरती झाल्यानंतर मागे बसलेलो असतांना एका अनोळखी व्यक्तीने माझ्या पाठीवर हात फिरवला. त्या वेळी माझी भावजागृती होऊन ‘काही वर्षांपूर्वी संतांनी माझ्या पाठीवरून हात फिरवला होता’, त्याची आठवण होऊन पुष्कळ कृतज्ञता वाटली.
स्वच्छता आणि वास्तूशुद्धी करणारे साधक यांच्यातील भावामुळे देवाने आम्हा सर्वांना अनुभूती दिली आणि या अनुभूती लिहून घेतल्या. याबद्दल गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. रोहिदास अंकुश कोरगांवकर, डोंबिवली, जिल्हा ठाणे.(२८.६.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |