शासकीय, तसेच खासगी रक्तपेढ्यांतील रक्ताच्या दरात वाढ !
मुंबई, २२ जुलै (वार्ता.) – शासकीय, तसेच खासगी रक्तपेढ्यांतील रक्ताच्या दरात वाढ करण्यात आली आहे. शासकीय रक्तपेढ्यांतून विकत मिळणार्या प्रतियुनिट रक्ताकरता पूर्वी ८५० रुपये द्यावे लागायचे. ते यापुढे १ सहस्र १०० रुपये देऊन विकत घ्यावे लागणार आहे. खासगी रक्तपेढ्यांतून विकत मिळणार्या प्रतियुनिट रक्ताकरता पूर्वी १ सहस्र ४५० रुपये द्यावे लागायचे. ते यापुढे १ सहस्र ५५० रुपये देऊन विकत घ्यावे लागणार आहे. शासकीय रुग्णालयात प्रविष्ट रुग्णाला मात्र रक्ताचा पुरवठा विनामूल्यच केला जाणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने याविषयीचा निर्णय ८ फेब्रुवारी या दिवशी घोषित केला आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी २० जुलै या दिवशी विधान परिषदेत दिली.
गरीब रूग्णांवर आर्थिक भार पडण्याची शक्यता !
शासकीय रुग्णालयात दाखल रुग्णांना रक्त आणि रक्त घटक जरी पूर्वीप्रमाणेच विनामूल्य मिळणार असले, तरी दारिद्य्ररेषेखालील जे रुग्ण खासगी रुग्णालयात शासनाच्या विविध आरोग्य विषयक योजनेंतर्गत विनामूल्य उपचारांसाठी जात असतात त्यांना वेळप्रसंगी विविध शस्त्रक्रियेकरता लागणारे रक्त या खासगी रुग्णालयांमधून पुरवण्यात येत नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना ते अन्य शासकीय अथवा खासगी रक्तपेढ्यांमधूनच विकत घ्यावे लागणार असल्याने गरीब रुग्णांवर याचा आर्थिक भार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रक्ताचे दर अल्प करण्याविषयी, तसेच खासगी रुग्णालयात उपचार घेणार्या दारिद्य्र रेषेखालील रुग्णांना आवश्यक असणार्या रक्त पुरवठ्याविषयी काही धोरण अथवा नियमावली निश्चित करण्याविषयी शासनाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही.