नवी मुंबईत आर्.टी.ई.च्या प्रतीक्षा सूचीतील ११७ विद्यार्थ्यांच्या पालकांनी लवकर प्रवेश घ्यावा ! – अरुणा यादव, शिक्षणाधिकारी
नवी मुंबई, २२ जुलै (वार्ता.) – नवी मुंबईत आर्.टी.ई.च्या प्रलंबित सूचीतील केवळ ११७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेणे शिल्लक आहे. त्यांच्या पालकांनी लवकरात लवकर कागदपत्रे पडताळणीसाठी सादर करून त्यांच्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन शिक्षण अधिकारी अरुणा यादव यांनी केले आहे. आर्.टी.ई. अंतर्गत शहरातील ९८ शाळांमध्ये पहिल्या लॉटरीत प्रतीक्षा सूचीच्या दुसर्या टप्प्यापर्यंत २ सहस्र ५५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. आता टप्पा क्रमांक ३ मधील प्रवेश प्रक्रिया १९ जुलैपासून चालू झाली आहे.
बालकांचा मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ अन्वये प्रतीवर्षीप्रमाणे खासगी विनाअनुदानित शाळेत एकूण पटाच्या २५ टक्के विद्यार्थांना विनामूल्य प्रवेश दिला जातो. त्यामध्ये अर्जांवरून पडताळणी समितीने प्रवेश निश्चित केले आहेत.