मुंबई येथे ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे ‘लेप्टो’ आजार होण्याची भीती !
मुंबई – गेल्या काही दिवसांपासून मुंबईत जोरदार पाऊस पडत असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचत आहे. त्यातूनच मुंबईकरांना ‘लेप्टो’चा संसर्ग होण्याची शक्यता आहे. ‘लेप्टोस्पायरोसिस’ हा एक गंभीर आजार असून वेळीच औषधोपचार न केल्यास तो प्राणघातक ठरू शकतो. त्यामुळे याविषयी वेळीच प्रतिबंधात्मक औषधोपचार करणे आवश्यक आहे. त्यासाठी महानगरपालिकेचे ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाने’ किंवा आरोग्य केंद्रे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे दवाखाने येथे संपर्क साधावा. या ठिकाणी वैद्यकीय पडताळणी-मार्गदर्शन आणि आवश्यक ते औषधोपचार विनामूल्य उपलब्ध आहेत, असे आवाहनही मुंबई महापालिकेने केले आहे.
मुंबई महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. शहा म्हणाल्या की, पावसाच्या पाण्यातून किंवा चिखलातून जाणार्या व्यक्तींनी २४ ते ७२ घंट्यांच्या आत वैद्यकीय समुपदेश घेऊन प्रतिबंधात्मक औषधोपचार करणे आवश्यक आहे. पावसाच्या साचलेल्या किंवा वहात्या पाण्यातून नागरिकांना नाईलाजाने चालावे लागते. याच पाण्यात ‘लेप्टोस्पायरोसिस’ या रोगाचे ‘लेप्टोस्पायरा’ (स्पायराकिट्स) हे सूक्ष्म जंतू असू शकतात. अशा बाधित पाण्याशी माणसाचा संपर्क आल्यास त्याला ‘लेप्टो’ची बाधा होण्याची शक्यता असते. व्यक्तीच्या पायाला किंवा शरिराच्या कोणत्याही भागाला जखम असेल, अथवा साधे खरचटलेले जरी असेल, तरी अशा छोट्याशा जखमेतूनही लेप्टोचे जंतू माणसाच्या शरिरात प्रवेश करतात. त्यामुळे ज्या व्यक्तींचा पावसाच्या पाण्याशी संपर्क आला असेल, त्यांनी तातडीने प्रतिबंधात्मक औषधोपचार करावेत.