‘दि.बा. पाटील चळवळ स्पर्धा’ या स्फूर्तीदायी उपक्रमाचे आयोजन !
नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेचा उपक्रम !
नवी मुंबई, २२ जुलै (वार्ता.) – ‘नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थे’च्या वतीने ‘दि.बा. पाटील चळवळ स्पर्धा’ या स्फूर्तीदायी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्य संयोजक माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांनी वाशी येथील पत्रकार परिषदेत बोलतांना दिली.
या वेळी ते म्हणाले की, संघर्षाचे ऊर्जास्थान असणारे दि.बा. पाटील यांची विविध प्रकारची आंदोलने, सभागृहातील संसदीय कार्याच्या जाज्वल्य इतिहासाचा शोध, बोध घेऊन लेख लिहिणे, व्हिज्युअल डॉक्युमेंटरी (माहितीपट) बनवणे, दि.बां.च्या संघर्षशील जीवनातील एखादे आंदोलन समोर ठेवून किंवा कार्याच्या महतीपर स्फूर्तीगीत (लेखन, व्हिडिओ, ऑडिओ) बनवणे, आंदोलनाची चित्र रेखाटणे, लघुपट बनवणे, लघुपटाचे ‘पोस्टर डिझाईन’ साकारणे या स्पर्धा अमर्याद (राज्यासह देशातील सर्वांसाठी) क्षेत्रासाठी खुल्या असणार आहेत.
यंदाच्या श्री गणेशोत्सव काळात श्रींसमोर याच संदर्भातील विषयांवर आरास देखावा करणे, ही स्पर्धाही यात समाविष्ट करण्यात आली आहे. ही स्पर्धा केवळ नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील घरगुती (ग्रामीण, शहर आणि झोपडपट्टी अशा तिन्ही गटांमध्ये) आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी खुल्या गटांत असणार आहे. स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी इच्छुक स्पर्धकांनी स्पर्धा व्यवस्थापक ऋतुजा भगत यांना ८८५०३१५७९५ या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा d.b.sphurtisthan@gmail.com या संगणकीय पत्त्यावर किंवा ‘दि.बा. स्फूर्तीस्थान चळवळ स्पर्धा’ या फेसबुक पृष्ठावर आणि sphurtisthan / ‘दि.बा. स्फूर्तीस्थान स्पर्धा’ या इन्स्टाग्राम पृष्ठावर संपर्क साधावा किंवा फॉलो करावे, असे आवाहन भगत यांनी केले आहे.