सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवासाठी महाराष्ट्रातून गोव्याला जाणार्या साधकांची निवास आणि भोजन यांची व्यवस्था करणारे सिंधुदुर्ग अन् रत्नागिरी येथील जिज्ञासू, हितचिंतक आणि धर्मप्रेमी !
‘सप्तर्षींच्या आज्ञेने यंदा सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ८१ वा जन्मोत्सव ‘ब्रह्मोत्सव’ म्हणून साजरा करण्यात आला. ११.५.२०२३ या दिवशी फोंडा (गोवा) येथे हा ब्रह्मोत्सव झाला. गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांतून आलेल्या एकूण १० सहस्रांहून अधिक साधकांच्या उपस्थितीत हा सोहळा अत्यंत भावभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून गोव्याला जाणार्या काही साधकांची निवास, अल्पाहार आणि महाप्रसाद यांची व्यवस्था करण्याची सेवा सिंधुदुर्ग अन् रत्नागिरी या जिल्ह्यांतील साधकांना मिळाली होती. या सेवेत सिंधुदुर्ग अन् रत्नागिरी येथील जिज्ञासू, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांनी सहभाग घेतला होता. या सेवेच्या माध्यमातून गुरुदेवांनी साधकांना अनेक गोष्टी शिकवल्या. हे सर्व त्यांच्या चरणी अर्पण करत आहोत.’ – (सद्गुरु) सत्यवान कदम, धर्मप्रचारक, सनातन संस्था, सिंधुदुर्ग. |
‘धर्मकार्यात साहाय्य कसे करायचे ?’, याचा आदर्श सर्वांसमोर ठेवणारे जिज्ञासू, हितचिंतक आणि धर्मप्रेमी अन् अन्य जिल्ह्यांतील साधकांची निवासव्यवस्था घरच्यासारखी करणारे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांतील साधक !
‘लेखात उल्लेख केलेले सिंधुदुर्ग अन् रत्नागिरी या जिल्ह्यांतील जिज्ञासू, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना साधकांनी साहाय्य करण्याविषयी विचारल्यावर सर्वांनीच धर्मकार्यात सहभागी होण्याची सिद्धता आनंदाने दर्शवली. ‘आम्हाला तुमच्यासारखे कार्य करण्यासाठी प्रत्यक्ष वेळ देता येत नाही; पण व्यवसायाच्या माध्यमातून जेवढे करता येईल, तेवढे साहाय्य करण्यासाठी प्रयत्न करतो’, असे सांगून सर्वांनी साधकांना आपलेपणाने सर्वतोपरी साहाय्य केले. धर्मकार्यातील त्यांचा सहभाग कौतुकास्पद आहे.
ब्रह्मोत्सवासाठी बाहेरगावाहून गोव्याला येणार्या साधकांची सिंधुदुर्ग अन् रत्नागिरी जिल्ह्यांतील साधकांनी घरच्याप्रमाणे व्यवस्था केली. ‘निरनिराळ्या जिल्ह्यांतील साधकांत किती कुटुंबभावना आहे !’, हेही यावरून समजते. सिंधुदुर्ग अन् रत्नागिरी या जिल्ह्यांत रहायला आलेल्या साधकांबद्दलही कोणाची काही तक्रार नव्हती, उलट सर्वांना बाहेरून आलेल्या साधकांची सोय करता आली; म्हणून आनंदच होत होता. ‘साधक येणार्या आणि रहाणार्या सर्व जिल्ह्यांतील साधकांची पुढील प्रगती जलद गतीने होईल’, याची मला निश्चिती आहे. सर्वांना शुभेच्छा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (७.७.२०२३)
१. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिज्ञासू, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद !
१ अ. सेवेची व्याप्ती बघून मनात अनेक प्रश्न निर्माण होणे आणि ‘गुरुदेवच सेवा करून घेणार आहेत’, याची जाणीव होऊन सेवेचे नियोजन करण्यास आरंभ करणे : ‘या कार्यक्रमासाठी मुंबई, पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांतून येणार्या साधकांच्या निवासाची व्यवस्था करणे, तसेच अल्पाहार आणि दुपारचा महाप्रसाद म्हणून पोळी-भाजी देणे’, या सेवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साधकांना देण्यात आल्या होत्या. आम्ही अशा प्रकारची सेवा प्रथमच करत असल्याने ‘मोठ्या संख्येने येणार्या साधकांची निवासव्यवस्था कशा पद्धतीने करायची ? सर्व सेवा वेळेत होतील ना ?’ इत्यादी अनेक प्रश्न आमच्या मनात निर्माण झाले. अशा स्थितीत ‘गुरुदेवच आमच्याकडून सर्व सेवा करून घेणार आहेत. आपण निमित्तमात्र आहोत’, याची जाणीव तीव्रतेने होऊन गुरुदेव आणि सद्गुरु सत्यवान कदम यांना शरण जाऊन आम्ही सेवेचे नियोजन करण्यास प्रारंभ केला.
१ आ. नियोजनाच्या सेवेला प्रारंभ करताच समाजातून मिळालेला सकारात्मक प्रतिसाद ! : या सेवेच्या दृष्टीने आम्ही ‘सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंगल कार्यालये, वेगवेगळ्या संप्रदायांचे आश्रम, भक्तनिवास, साधकांची घरे’ इत्यादी ठिकाणी संपर्क करण्यास प्रारंभ केला. गुरुकृपेने आम्हाला सर्व ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद मिळत गेला. त्या वेळी ‘गुरुदेवच सर्व करून घेत आहे’, याची अनुभूती येऊन आमचा सेवेतील उत्साह आणि आनंद वाढला.
१ आ १. साधकांची उत्तम निवासव्यवस्था करणारे ‘सरसोली धाम’ या आश्रमाचे व्यवस्थापन पहाणारे स्थानिक उद्योजक श्री. चंदूभाई पटेल ! : मे मास चालू असल्यामुळे अनेक ठिकाणी पुरेसे पाणी उपलब्ध होऊ शकत नसल्याने निवासव्यवस्था करण्यात काही ठिकाणी अडचणी येत होत्या. कुडाळ शहराच्या जवळच कविलगाव येथे ‘सरसोली धाम’ हा आश्रम आहे. याविषयी आश्रमाचे व्यवस्थापन पहाणारे स्थानिक उद्योजक श्री. चंदूभाई पटेल यांना सांगितल्यावर त्यांनी त्वरित बहुमूल्य सहकार्य केल्याने तेथे १५० साधकांची निवासव्यवस्था चांगल्या प्रकारे होऊ शकली.
श्री. चंदूभाई पटेल महत्त्वाच्या कामासाठी बाहेरगावी गेले होते, तरीही त्यांनी केवळ भ्रमणभाषवर त्यांच्या सर्व सहकार्यांना संपर्क साधून सहकार्य करण्यास सांगितले. ‘सरसोली धाम’च्या स्थानिक व्यवस्थापकांनीही आपुलकीने स्वतः लक्ष घालून सर्व साहाय्य केले. त्यामुळे सर्व साधकांची उत्तम निवासव्यवस्था होऊ शकली. येथे कार्यरत असलेले सर्व सेवक अतिशय आपुलकीने आणि प्रेमाने साहाय्य करत होते. त्यामुळे ‘सकारात्मक राहून सेवेसाठी प्रारंभ केल्यावर गुरुदेवांनी सर्व आधीच केलेले असते, आपण केवळ साधना म्हणून प्रयत्न करायचे’, याची अनुभूती आम्हाला घेता आली.
१ आ २. धर्मकार्यातील सहभाग म्हणून साधकांची निवास, प्रसाद आणि महाप्रसाद यांची व्यवस्था अल्प मूल्यात उपलब्ध करून देणारे पावशी येथील ‘शांतादुर्गा मंगल कार्यालया’चे मालक श्री. सुभाष वाटवे ! : कुडाळ तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गावर पावशी येथे ‘शांतादुर्गा मंगल कार्यालय’ आहे. या मंगल कार्यालयाचे मालक श्री. सुभाष वाटवे यांना साधकांच्या निवास व्यवस्थेच्या संदर्भात संपर्क केला होता. मे मासात विवाहाचे मुहूर्त असल्याने ते व्यस्त होते, तरी त्यांनी साधकांसाठी ही सेवा उपलब्ध करून देण्याचे मान्य केले. १५० हून अधिक साधकांचा निवास, सकाळचा चहा आणि अल्पाहार, तसेच दुपारी महाप्रसादासाठी पोळी अन् भाजी पिशवीत (पॅकेट्स) बांधून अल्प मूल्यात उपलब्ध करून दिली.
साधकांची निवासव्यवस्था योग्य पद्धतीने होण्यासाठी त्यांनी सतरंज्या, गाद्या, गरम पाणी आणि पंखे इत्यादी व्यवस्था स्वतः लक्ष घालून व्यवस्थित करून दिली. श्री. वाटवे यांच्याशी बोलतांना लक्षात आले, ‘एवढ्या मोठ्या धर्मकार्यात सेवेची संधी मिळाली आहे’, हा भाव ठेवून ते सेवा करत होते.
१ आ ३. ‘सेवा मिळणे ही भगवंताची कृपा आहे’, या भावाने साधकांचे नियोजन करणार्या साळगाव येथील ‘सावित्री लीला मंगल कार्यालया’च्या सौ. स्मिता विजय उपाख्य माई नाईक ! : सिंधुदुर्गातील साळगाव येथील ‘सावित्री लीला मंगल कार्यालया’च्या सौ. स्मिता विजय उपाख्य माई नाईक (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७४ वर्षे) या ‘परम पूज्य कलावती आई’ यांच्या भक्त आहेत. त्यांना साधकांच्या निवासव्यवस्थेविषयी सांगितल्यावर त्यांनी १०० हून अधिक साधकांची निवासव्यवस्था विनामूल्य केली. याविषयी त्या म्हणाल्या, ‘‘हे सर्व भगवंताचे नियोजन आहे. ‘मला घरबसल्या सेवा करायला मिळत आहे’, ही भगवंताची कृपा आहे. त्या दिवशी मंगल कार्यालयात कोणते लग्नकार्य नाही. त्यामुळे आम्ही मंगल कार्यालय उपलब्ध करून देऊ शकतो.’’ त्यांनी पुरुष आणि महिला साधकांसाठी वेगवेगळ्या सभागृहांची व्यवस्था केली होती. अंघोळीसाठी गरम पाण्याची व्यवस्था आणि साधकांना झोपण्यासाठी सतरंज्या अन् चटया उपलब्ध करून दिल्या.
‘या ठिकाणी ४ शौचालये आणि ४ स्नानगृहे होती. त्यामुळे १०० साधकांचे आवरण्याचे नियोजन कसे होणार ?’, असा विचार आमच्या मनात सतत येत होता; मात्र गुरुदेवांच्या कृपेने सकाळी ८.३० वाजेपर्यंत सर्व साधकांचे आवरून झाले. सेवा करतांना काही अडचणीही येत होत्या, तरीही गुरुदेवांच्या कृपेने त्यावर उपाययोजनाही सूचत होत्या. त्यामुळे ‘गुरुदेवांना शरण जाऊन आणि प्रार्थना करून सेवा केल्यास ते सर्वांची काळजी घेतात’, याची अनुभूती सेवेतील सहभागी साधकांना पदोपदी येत होती.
१ आ ४. साधक वृत्तीचे झाराप येथील ‘हॉटेल आचारी’चे मालक श्री. संतोष चव्हाण !
१ आ ४ अ. दुपारच्या महाप्रसादासाठी अल्प मूल्यात पोळी आणि भाजी उपलब्ध करून देणे : झाराप येथील ‘हॉटेल आचारी’चे मालक श्री. संतोष चव्हाण यांनी ठिकठिकाणी निवासासाठी असलेल्या साधकांना अल्पाहार, तसेच दुपारच्या महाप्रसादासाठी पोळी आणि भाजी अल्प मूल्यात उपलब्ध करून दिली. या सेवेचे नियोजन करतांना पोळी-भाजीची मागणी सतत वाढत होती, तरीही त्यांनी ते स्वीकारून अल्प कालावधीत त्याचे नियोजन चांगल्या प्रकारे केले.
१ आ ४ आ. साधकांवर विश्वास ठेवून त्यांनी दिलेले पैसे तपशील न पडताळता स्वीकारणे : या सर्व नियोजनात साधकांचे सहकार्य आणि समजूतदारपणा पाहून श्री. चव्हाण यांना कृतज्ञता वाटत होती. कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही त्यांना हिशोब देण्यासाठी गेलो होतो, तेव्हा त्यांनी ‘तुम्ही ठेवलेल्या सर्व नोंदी योग्यच आहेत’, असे सांगून फारसा तपशील न पडताळता पैसे घेतले.
१ आ ४ इ. सर्वांना चांगल्या गुणवत्तेचा अल्पाहार आणि महाप्रसाद मिळण्यासाठी स्वतः जातीने लक्ष घालणे : ब्रह्मोत्सव झाल्यावर गोवा येथून पुन्हा साधकांच्या परतीच्या प्रवासाच्या वेळी श्री. चव्हाण यांना ऐनवेळी महाप्रसाद उपलब्ध करून देण्याविषयी विचारले. त्या वेळीही त्यांनी स्वतःच्या व्यस्त नियोजनात साधकांना अल्प मूल्यात महाप्रसाद उपलब्ध करून दिला. ‘सर्वांना चांगल्या गुणवत्तेचा अल्पाहार आणि पोळी अन् भाजी मिळावी’, यासाठी ते स्वतः लक्ष घालून सर्व करत होते.
‘मला तुमच्यासारखे कार्य करण्यासाठी प्रत्यक्ष वेळ देता येत नाही; पण माझ्या व्यवसायाच्या माध्यमातून जेवढे करता येईल, तेवढे साहाय्य करण्यासाठी प्रयत्न करतो’, असा भाव ठेवून श्री. चव्हाण यांनी सर्व सेवा केली.
‘साधकांना विनासायास सुविधा मिळावी’, यासाठी गुरुदेव श्री. चव्हाण यांच्या माध्यमातून कार्यरत आहेत. तेच श्री. चव्हाण यांना सर्व नियोजन करण्यासाठी बुद्धी आणि शक्ती देत आहेत’, असे आम्हा साधकांना जाणवत होते.
१ आ ५. साधकांची व्यवस्था आनंदाने करणारी ‘संत सोहिरोबानाथ आंबिये आत्मसाक्षात्कार मंदिर सेवा समिती’ आणि ‘उत्कर्ष युवक कला क्रीडा मंडळ’ ! : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली येथे ‘संत सोहिरोबानाथ आंबिये आत्मसाक्षात्कार मंदिर’ आहे. या मंदिराच्या भक्त निवासामध्ये काही साधकांचे सकाळचे आवरणे आणि चहा अन् अल्पाहार यांची व्यवस्था करण्यात आली होती. ‘संत सोहिरोबानाथ आंबिये आत्मसाक्षात्कार मंदिर सेवा समिती’ आणि तेेथील ‘उत्कर्ष युवक कला क्रीडा मंडळ’ यांनी संयुक्तपणे ही व्यवस्था विनामूल्य अन् आनंदाने केली.
१ आ ६. कसाल येथील धर्मप्रेमी श्री. यशवंत परब यांनी अन्य धर्मप्रेमींच्या साहाय्याने साधकांची चहा-अल्पाहाराची व्यवस्था विनामूल्य करणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कसाल येथील धर्मप्रेमी श्री. यशवंत परब यांच्या मुंबई-गोवा महामार्गावरील इमारतीमध्ये ४० हून अधिक साधकांचे सकाळचे आवरणे आणि चहा-अल्पाहार यांची व्यवस्था करण्यात आली होती.
श्री. परब यांनी स्थानिक धर्मप्रेमींच्या साहाय्याने ही सेवा विनामूल्य उपलब्ध करून दिली.’
१ आ ७. बेळणे येथील ‘श्री मंगल कार्यालया’चे मालक श्री. गजानन प्रभुदेसाई यांनी साधकांच्या निवासव्यवस्थेसाठी अल्प मूल्यात सभागृह आणि अल्पाहार उपलब्ध करून देणे : ‘गोवा येथे ब्रह्मोत्सवासाठी येणार्या सोलापूर जिल्ह्यातील साधकांच्या निवासव्यवस्थेची सेवा करण्यास आरंभ केला. फोंडाघाट, वैभववाडी, तळेरे, बेळणे, अशा ठिकाणी आम्ही साधकांच्या निवासव्यवस्थेसाठी जागेचा शोध घेऊ लागलो.
बेळणे येथील ‘श्री मंगल कार्यालया’चे मालक श्री. गजानन प्रभुदेसाई यांना भेटल्यावर त्यांनी लगेच सांगितले, ‘‘आम्ही प्रती माणशी ५० रुपये घेतो; परंतु तुमचे कार्य पुष्कळ चांगले आहे आणि ‘तुमचे साधक कोणतीही अस्वच्छता करणार नाहीत’, याची मला निश्चिती आहे. त्यामुळे तुम्ही द्याल तेवढे पैसे मी घेईन.’’ त्यांनी २० रुपये प्रती साधक याप्रमाणे आणि त्यांचे सभागृह उपलब्ध करून दिले. तेथे पंख्यांची पुष्कळ चांगली व्यवस्था होती. त्यांनी साधकांना सकाळी अंघोळीसाठी गरम पाणी उपलब्ध करून दिले, तसेच अल्प मूल्यामध्ये अल्पाहाराची सोय केली. त्या ठिकाणी जवळपास ९० हून अधिक साधकांची व्यवस्था झाली. ‘सनातन संस्थेविषयी असलेला समाजाचा विश्वास आणि ‘गुरुदेव साधकांची कशी काळजी घेतात ?’, हे आम्हाला पुन्हा एकदा अनुभवता आले अन् आमच्याकडून गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त झाली.’
– डॉ. नितीन ढवण, फोंडाघाट, कणकवली, सिंधुदुर्ग.
२. रत्नागिरी जिल्ह्यातील धर्मप्रेमी आणि हितचिंंतक यांचा मिळालेला प्रतिसाद !
अ. ‘लांजा (जिल्हा रत्नागिरी) येथील धर्मप्रेमी श्री. हरीश जगन्नाथ दळवी यांनी साधकांच्या निवासव्यवस्थेसाठी स्वतःचे घर उपलब्ध करून दिले.
आ. लांजा येथील हितचिंतक श्री. मनोज ठाकूरदेसाई यांनी साधकांना अत्यल्प मूल्यात अल्पाहार उपलब्ध करून दिला.’
– श्री. महेंद्र चाळके, चिपळूण आणि सौ. भक्ती महाजन, लांजा, जिल्हा रत्नागिरी.
३. साधकांनी व्यक्त केलेली कृतज्ञता !
‘या सर्व सेवेच्या कालावधीत अनेक अडचणीही येत होत्या; पण गुरुदेवांचा संकल्प, सद्गुरु सत्यवानदादांची (सद्गुरु सत्यवान कदम यांची) तळमळ आणि साधकांचे प्रयत्न यांमुळे ही सेवा आम्हाला आनंदाने करता आली. या सेवेच्या कालावधीत आमच्यामध्ये कृतज्ञताभाव निर्माण होत होता. ‘आपत्काळात अल्प कालावधीत साधकांची व्यवस्था कशा प्रकारे करायला हवी ? सेवा करतांना कोणकोणत्या बारकाव्यांचा विचार व्हायला हवा ?’, हेही देवाने या सेवेच्या माध्यमातून शिकवले आणि पुष्कळ आनंदही दिला. या सेवेची संधी दिल्याबद्दल गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– साधकांच्या निवासव्यवस्थेच्या संदर्भातील नियोजनाची सेवा करणारे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील साधक (सर्व सूत्रांचा दिनांक : २.६.२०२३)
– श्री. राजेंद्र पाटील आणि सौ. अर्चना घनवट, कुडाळ, सिंधुदुर्ग. (२.६.२०२३)
‘जगद्गुरु नरेंद्र महाराज न्यासा’च्या (ट्रस्टच्या) वतीने नाणीज (रत्नागिरी) येथे साधकांची निवास अन् भोजन यांची विनामूल्य व्यवस्था करण्यात येणे‘जळगाव जिल्ह्यातून आलेल्या ५६ साधकांची ‘जगद्गुरु नरेंद्र महाराज न्यासा’च्या (ट्रस्टच्या) वतीने रत्नागिरी जिल्ह्यातील नाणिज येथे निवास अन् भोजन यांची विनामूल्य व्यवस्था करण्यात आली होती. याविषयी न्यासाचे विश्वस्त श्री. सुनील ठाकूर म्हणाले, ‘‘हे कार्य आपलेच आहे. दोन्ही संस्थांचे कार्य एकच आहे.’’ – श्री. महेंद्र चाळके, चिपळूण आणि सौ. भक्ती महाजन, लांजा, जिल्हा रत्नागिरी. (२.६.२०२३) |
जन्मोत्सवानिमित्त गोवा येथे जाणार्या साधकांची निवासव्यवस्था स्वतःच्या घरी करतांना उत्साह, भाव आणि आनंद अनुभवणारे रत्नागिरी अन् सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील साधक !
१. ‘साधकांच्या माध्यमातून गुरुदेव निवासाला येणार आहेत’, या भावाने साधकांची सेवा करणारे तेर्सेबांबर्डे (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील श्री. श्रीनिवास पै आणि सौ. सीमा पै !
१ अ. साधकांच्या निवासाच्या नियोजनाविषयी विचारल्यावर श्री. आणि सौ. पै यांनी तात्काळ होकार देणे अन् ‘आपली वास्तू साधकांच्या सेवेसाठी वापरली जाणार आहे’, असा भाव असल्याने त्यांना आनंद होणे : ‘श्री. श्रीनिवास पै आणि सौ. सीमा पै यांचे मुंबई-गोवा महामार्गावर तेर्सेबांबर्डे (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे उपाहारगृह आहे; मात्र सध्या ते बंद आहे. श्री. आणि सौ. पै यांना जन्मोत्सवानिमित्त येणार्या साधकांच्या निवासाच्या नियोजनाविषयी विचारल्यावर त्यांनी तात्काळ होकार दिला. ‘साधकांच्या माध्यमातून गुरुदेवच निवासाला येणार आहेत. त्यांच्या सेवेसाठी त्यांची ही वास्तू उपयोगात येणार’, असा त्यांचा भाव असल्याने त्यांना पुष्कळ आनंद झाला आणि कृतज्ञताही वाटली. त्या दोघांनी स्वतः तेथील शौचालये आणि स्नानगृहे यांची स्वच्छता केली अन् आवश्यकतेनुसार पंखे बसवून घेतले. साधकांना अंघोळीसाठी गरम पाणी मिळावे; म्हणून त्यांनी बाहेर चूल पेटवली.
१ आ. ऐनवेळी नियोजनात झालेला पालट सकारात्मकतेने स्वीकारणे आणि साधकांची सर्व व्यवस्था प्रेमाने करणे : प्रारंभी ‘श्री. पैकाका आणि काकू यांच्याकडे साधकांचे एकच वाहन थांबणार’, असे नियोजन होते; परंतु ऐनवेळी ११.५.२०२३ या दिवशी सकाळी २ वाहने थांबण्याचे नियोजन झाले, तरीही दोघे सकारात्मक होते. साधक सगळे व्यवस्थित आवरून कार्यक्रमासाठी गेल्यानंतरच काका आणि काकू कार्यक्रमाला जायला निघाले. कार्यक्रम झाल्यानंतर परतीच्या प्रवासात पहाटे ३ वाजेपर्यंत साधक आवरण्यासाठी उपाहारगृहाच्या ठिकाणी थांबले होते. तेव्हाही त्यांनी साधकांना सर्व सहकार्य केले.’ – श्री. राजेंद्र पाटील आणि सौ. अर्चना घनवट, कुडाळ, सिंधुदुर्ग.
२. ‘रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथे अनुमाने १०० साधकांची निवासव्यवस्था करण्यात आली होती. धुंदरे (लांजा, रत्नागिरी) येथे मुंबई आणि पुणे येथून नव्याने वास्तव्यास आलेल्या साधकांच्या घरी साधकांची निवासव्यवस्था केली होती.
३. साधकांच्या निवासाची व्यवस्था करतांना साधकांना उत्साह आणि आनंद जाणवणे अन् आलेल्या सर्व साधकांविषयी जवळीक वाटणे
११.५.२०२३ या दिवशी गोवा येथे ब्रह्मोत्सव सोहळा होता. त्याच्या आदल्या दिवशी, म्हणजे १०.५.२०२३ या दिवशी काही स्थानिक साधकांच्या घरी बाहेरगावाहून येणार्या साधकांचे निवासाचे नियोजन करण्यात आले होते. ‘साधक घरी येणार आहेत’, हे समजल्यावर ‘परम पूज्य गुरुदेवच घरी येणार आहेत’, असा भाव साधकांच्या मनात आपोआप निर्माण झाला आणि त्या भावाने सर्व सिद्धता करता आली. साधकांसाठी सिद्धता करतांना त्यांना पुष्कळ उत्साह जाणवत होता. त्यांना जराही थकवा जाणवत नव्हता. सर्व सेवा वेळेत झाल्या. मध्यरात्री विलंबाने साधक आल्यानंतर, तसेच पहाटे लवकर उठून सिद्धता करत असतांना झोप अल्प होऊनही अतिशय उत्साह जाणवत होता. सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. ‘आलेल्या सर्व साधकांविषयी पुष्कळ आपुलकी वाटत होती’, अशा शब्दांत अनेक साधकांनी कृतज्ञता व्यक्त केली.’
– साधकांच्या निवासव्यवस्थेच्या संदर्भातील नियोजनाची सेवा करणारे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील साधक
(सर्व सूत्रांचा दिनांक : २.६.२०२३)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |