रत्नागिरीत अत्याधुनिक कक्ष उभारणार ! – पालकमंत्री उदय सामंत

पालकमंत्र्यांची जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट

आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट

रत्नागिरी  – पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट देवून पहाणी केली. अत्याधुनिक कक्ष उभारणीसाठी आवश्यक तो निधी दिला जाईल. त्यासाठी प्रस्ताव सिद्ध करण्याच्या सूचनाही पालकमंत्री उदय सामंत यांनी या वेळी दिल्या.

जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह माहिती देतांना म्हणाले, ‘‘८४६ ग्रामपंचायतींमध्ये ‘पब्लिक ॲड्रेस सिस्टीम’द्वारे (सार्वजनिक पत्ता प्रणालीद्वारे) उद्घोषणा देऊन ग्रामस्थांपर्यंत संदेश पोचला जातो. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी यांनी इतर कामकाजाची माहिती देवून प्रात्यक्षिक दाखवले.

पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, ‘‘मुंबई आणि रायगडच्या धर्तीवर एक अत्याधुनिक साधनसामुग्रीने युक्त असा आपल्या जिल्ह्याचा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष उभा करा. त्यासाठीचा संपूर्ण प्रस्ताव सिद्ध करावा. या कक्षात आवश्यक मनुष्यबळही दिले जाईल, तसेच बांधकाम विभागाकडून आवश्यक तेथे कक्षाची दुरुस्ती, नूतनीकरण, रंगरंगोटी करून घ्यावी. त्यासाठी पुरेसा निधी दिला जाईल.’’  या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तहसीलदार ज्योती वाघ आदी उपस्थित होते.