लोकांच्या कल्याणासाठी अधिकार्यांनी तत्परतेने काम करावे ! – पालकमंत्री उदय सामंत
धोकादायक साकव आणि दरड प्रवण गावांचे सर्व्हेक्षण करण्याचे आदेश
रत्नागिरी – प्रत्यक्ष स्थळी जावून, गावाला भेट देवून अधिकार्यांनी धोकादायक साकव आणि दरड प्रवण गावांचे सर्व्हेक्षण करावे. एक अधिकारी काय करू शकतो ? याचे उदाहरण रायगडचे प्रांताधिकारी अजित नैराळे यांनी कृतीतून दाखवून दिले आहे. लोकांच्या कल्याणासाठी अधिकार्यांनी तत्परतेने आणि प्रामाणिकपणे काम करावे, अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या.
पालकमंत्री श्री. सामंत यांनी जिल्हा नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाविषयी बैठक घेतली. बैठकीला आमदार योगेश कदम, जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पूजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, ‘‘जलसंपदा विभागाने जगबुडीचा गाळ काढण्यासाठी तात्काळ नाम फाऊंडेशनला पत्र द्यावे. हलगर्जीपणा करणार्या अधिकार्यांची अजिबात गय केली जाणार नाही, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. दरड प्रवण भागांतील गावांची सूची बनवतांना अधिकार्यांनी प्रत्यक्ष गावाला भेट देवून माहिती घ्यावी. तसेच धोकादायक, नादुरुस्त साकवांच्या विषयीही माहिती घ्यावी. खेडमधील ज्या भागात अद्याप वीज बंद असेल, तेथे महावितरणने जलद गतीने कामकाज करून ती पूर्ववत् करावी.’’
संपादकीय भूमिकाअधिकार्यांना अशा सूचना का द्याव्या लागतात ! खरे तर अधिकार्यांनी स्वत:च लोकांच्या कल्याणासाठीच कामे करायला हवीत ! |