राजस्थानमधील काँग्रेस सरकारचे मंत्री राजेंद्र गुढा यांची हकालपट्टी !

मणीपूरमधील दोन महिलांवरील अत्याचाराविषयी बोलणार्‍या स्वपक्षातील आमदारांना आत्मपरिक्षणाचा सल्ला दिल्याची शिक्षा !

काँग्रेसचे पंचायत राज आणि ग्रामविकास मंत्री राजेंद्र गुढा

 जयपूर (राजस्थान) – राजस्थानमध्ये महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आमचे सरकार महिलांना सुरक्षा पुरवण्यात अपयशी ठरले आहे. मणीपूरमधील २ महिलांवरील अत्याचाराविषयी बोलण्याऐवजी आपण आत्मपरिक्षण केले पाहिजे, अशा शब्दांत स्वतःच्या सरकारला भर विधानसभेतच आरसा दाखवणारे काँग्रेसचे पंचायत राज आणि ग्रामविकास मंत्री राजेंद्र गुढा यांची २४ घंट्यांतच पदावरून हकालपट्टी करण्यात आली.

२१ जुलै या दिवशी राजस्थान विधीमंडळात ‘राजस्थान किमान उत्पन्न हमी विधेयक २०२३’ वर चर्चा चालू होती. या वेळी काँग्रेसच्या आमदारांनी मणीपूरमध्ये महिलांना विवस्त्र करून धिंड काढून सामूहिक बलात्कार केल्याच्या प्रकरणी प्रश्‍न उपस्थित केला होता. त्या वेळी राजेंद्र गुढा यांनी वरील विधान करत स्वतःच्या पक्षातील आमदारांना सुनावले.

मला हटवण्यापेक्षा महिलांच्या सुरक्षेसाठी काम करा ! – राजेंद्र गुढा

मला पदावरून हटवून काय होणार आहे ? यापेक्षा महिलांच्या सुरक्षेसाठी काम केले पाहिजे. मी विधानसभेत याविषयी सर्वांना विचारणा करणार आहे, अशी प्रतिक्रिया राजेंद्र गुढा यांनी व्यक्त केली आहे.

(म्हणे) ‘हा पक्षांतर्गत प्रश्‍न !’ – मुख्यमंत्री अशोक गेहलोत

राजेंद्र गुढा यांना पदावरून हटवण्यात आल्याच्या प्रकरणी एका कार्यक्रमात पत्रकारांनी राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना प्रश्‍न विचारल्यावर ते म्हणाले की, हा आमच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्‍न आहे. याविषयी आम्ही चर्चा करू. आता जो कार्यक्रम येथे आयोजित करण्यात आला आहे, त्याविषयी तुम्ही प्रश्‍न विचारा. (यावरून मुख्यमंत्र्यांना महिलांच्या सुरक्षेविषयी किती कळवळा आहे ?, हे स्पष्ट होते ! – संपादक)

संपादकीय भूमिका

ही आहे काँग्रेसची खरी मनोवृत्ती ! अशा काँग्रेसला महिलांच्या सुरक्षेविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का ? सोनिया गांधी आणि प्रियांका वाड्रा याविषयी काही बोलत का नाहीत ?