राज्यांचे वक्फ बोर्ड अहमदिया मुसलमानांना ‘मुसलमानेतर ’ ठरवू शकत नाही !

  • केंद्र सरकारचे निर्देश !

  • आंध्रप्रदेशातील वक्फ बोर्डाने अहमदिया मुसलमानांना ठरवले होते ‘मुसलमानेतर’ !

अहमदिया मुसलमान (प्रतिकात्मक चित्र)

नवी देहली – राज्य वक्फ बोर्डांना देशातील अहमदिया मुसलमानांना ‘काफिर’ किंवा ‘मुसलमानेतर’ म्हणण्याचा अधिकार नाही, असे स्पष्ट निर्देश केंद्र सरकारने दिले. तसेच अहमदिया मुसलमानांच्या मशिदींना वक्फ संपत्ती नसल्याचे घोषित करण्याचाही अधिकार नसल्याचे म्हटले आहे. देवबंद मौलवींची संघटना ‘जमितय-ए-उलेमा’च्या फतव्यानंतर आंध्रप्रदेश वक्फ बोर्ड कडून अहमदिया मुसलमानांना मुसलमानेतर ठरवण्यात आले होते. यास अहमदिया मुसलमान विरोध करत होते. त्यांनी आंध्रप्रदेश उच्च न्यायालयात याचिकाही प्रविष्ट केली आहे.

केंद्र सरकारच्या अल्पसंख्यांक मंत्रालयाकडून आंध्रप्रदेशच्या मुख्य सचिवांना या संदर्भात पत्र लिहिण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, तुम्ही अधिनियमातील प्रावधानानुसार राज्य सरकारचे एक मंडळ आहात. तुम्हाला अशा प्रकारचा फतवा (फतवा’ म्हणजे इस्लामी कायद्यानुसार एखाद्या सूत्रावर मान्यताप्राप्त व्यक्ती किंवा संस्था यांनी दिलेला निर्णय) काढण्याचा अधिकार नाही.

वक्फ बोर्डाच्या या आदेशावरून त्यांची अहमदिया मुसलमानांविषयीची घृणा दिसून येते. वक्फ बोर्डाला अहमदिया किंवा अन्य कुठल्याही समाजाची धार्मिक ओळख निश्‍चित करण्याचा कोणताही अधिकार नाही.