सिंधुदुर्ग जिल्ह्यात २४ जुलैपर्यंत अतीमुसळधार पावसाची चेतावणी

मुसळधार पावसामुळे पडझडीच्या घटना, वीजपुरवठा खंडित होणे आदी घटना

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात २४ जुलैपर्यंत अतीमुसळधार पावसाची चेतावणी (रेड अलर्ट) देण्यात आली आहे. त्यानुसार ग्रामपंचायत ते जिल्हास्तरावरील यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे. त्यासाठी तालुका स्तरावर ‘व्हॉट्सॲप ग्रुप’ सिद्ध करण्यात आले आहेत. शासकीय यंत्रणा सतर्क असल्याने या पूरपस्थितीत जिल्ह्यात मोठी हानी झाली नाही. हानीग्रस्तांना भरपाई देण्याचे काम, तसेच पंचनामा करण्याचे काम चालू करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी सावंतवाडी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. गेले २ दिवस पडत पडलेल्या मुसळधार पावसाने काही अंशी उसंत घेतल्याने जीवन पूर्वपदावर येत असले, तरी २४ जुलैपर्यंत धोका कायम आहे. मुसळधार पावसामुळे पडझडीच्या घटना, वीजपुरवठा खंडित होणे आदी घटना घडल्यास असून काही ठिकाणी नागरिकांना स्थलांतर करावे लागले आहे.

सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी

१. कुडाळ तालुक्यात वालावल-हुमरमळा येथील कमळेवाडीतील एका घराला तडे जाऊन भिंत कोसळली आहे. अनेक घंटे प्रशासनाचे सहकार्य मिळाले नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
२. बांदा-दाणोली मार्गावरील सरमळे येथील नदीवर याच वर्षी बांधण्यात आलेल्या पुलाचा एका बाजूचा जोडरस्ता खचल्याने वाहनचालकांना प्रवास करणे कठीण झाले आहे.
३. झोळंबे, तुळस, सरंबळ, शिरशिंगे या ठिकाणी संभाव्य भूस्खलनावर आवश्यक ती सावधानता प्रशासनाने घेतली आहे.
४. कुडाळ येथे नवीन बसडेपोच्या जवळील मार्गावर पाण्यातून दुचाकी घेऊन जाणारा तरुण वहात जाऊ लागला. हे लक्षात येताच काळपवाडी येथील सागर काळप, निकेश काळप आणि शैलेश धुरी या युवकांनी त्याला वाचवले.
५. मातोंड- होडावडा पुलानजीकच्या पुराच्या पाण्यात अडकलेल्या तुळस येथील तरुणाला मातोंड येथील होमगार्ड समादेशक अधिकारी संतोष विष्णु मातोंडकर यांच्यासह ग्रामस्थांनी पाण्यात उतरून दोरखंडाच्या साहाय्याने बाहेर काढले. पाण्यात ८ फूट उंचीच्या झाडावर हा तरुण ३-४ घंटे अडकला होता.
६. दोडामार्ग-बांदा राज्यमार्गावर कळणे खाण आस्थापनाच्या प्रवेशद्वारावर गाळ आणि चिखलयुक्त पाणी साचू लागले आहे. त्यामुळे राज्यमार्गावर चिखलाचे साम्राज्य झाले आहे. परिणामी वाहतूकदारांना नाहक त्रास होत असून अपघात घडण्याची शक्यता आहे.

७. माणगाव-डोंगरवाडी येथील एका घराची मातीची भिंत २० जुलै या दिवशी कोसळली.
८. सावंतवाडी येथे भटवाडी-जुना चित्रपटगृह परिसरात भले मोठे आंब्याचे झाड रस्त्याच्या मधोमध कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती, तसेच येथील वेदपाठशाळेची १०० फूट लांब संरक्षक भिंतही पावसामुळे पडली.
९. बांदा शहरातील उभाबाजार येथील सुदन भास्कर वाळके यांच्या घराची मातीची भिंत कोसळून ८० सहस्र रुपयांची हानी झाली.
१०. मालवण शहराच्या नजीक सागरी महामार्गावरील कुंभारमाठ-देवली येथील रस्त्याचा भाग पावसामुळे खचला आहे. वाहतुकीस धोका निर्माण झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस प्रशासन यांनी २१ जुलै या दिवशी हा मार्ग वाहतुकीस बंद केला आहे.
११. सावंतवाडी तालुक्यात भोमवाडी, सातार्डा येथे विद्युत्भारित वाहिनी तुटून पडल्याने म्हशीचा जागीच मृत्यू झाला.
१२. कुडाळ तालुक्यात वालावल, बंगेवाडी येथे भूस्खलन होऊन घरांना धोका निर्माण झाला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भाजपचे नेते नीलेश राणे यांनी त्वरित वालावल गावाशी संपर्क करून धोकादायक स्थितीत असलेल्या घरांतील स्थानिकांना स्थलांतराच्या सूचना दिल्या आणि येथील परिस्थितीचा आढावा घेतला.

जिल्ह्यात आतापर्यंत झालेली हानी

सिंधुदुर्गनगरी – पावसामुळे आतापर्यंत जिल्ह्यात १ व्यक्तीचा, तर ४ गुरांचा मृत्यू झाला आहे. ६ सार्वजनिक मालमत्तांची हानी झाली आहे. पुराचे पाणी घरात घुसल्याने सध्या ३९ कुटुंबे स्थलांतरित करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील १६ लघु आणि ३ मध्यम धरणांतून अतिरिक्त पाणी सोडण्यात येत आहे. आतापर्यंत एकूण १५२ घरांची, ३ झोपड्या, २२ गोठे आणि १ पोल्ट्री फार्मची हानी झाली आहे.

पिंगुळी आणि बिबवणे येथे पुरामुळे ग्रामस्थांचे स्थलांतर

२० जुलै या दिवशीच्या मुसळधार पावसामुळे कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील एका कुटुंबातील ५ सदस्य आणि बिबवणे येथे ५ कुटुंबातील १५ सदस्य, अशा एकूण २० सदस्यांना सुरक्षितस्थळी हालवण्यात आले आहे.