राजकीय भांडवलासाठी विरोधकांनी सभागृहात गोंधळ घालू नये ! – डॉ. नीलम गोर्हे, उपसभापती, विधान परिषद
मणीपूर बलात्कार प्रकरणावरून उपसभापतींनी विरोधकांना खडसावले !
मुंबई, २१ जुलै (वार्ता.) – मणीपूर बलात्कारावरून विधान परिषदेत सभागृहात घोषणा देणार्या विरोधकांना ‘राजकीय भांडवलासाठी तुम्ही सभागृहात गोंधळ करू नका’, असे उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी २१ जुलै या दिवशी विरोधकांना खडसावले. ‘देहली येथे निर्भया हत्या प्रकरण घडले, त्या वेळी कुणाचे राज्य होते ?, हे आपण पाहिले नव्हते. कुर्ला येथे असेच प्रकरण घडले, तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार होते, तेव्हा आपण ‘शक्ती’ कायदा केला, असे सांगून या प्रकरणी ‘विरोधकांनी राजकारण करू नये’, असे नीलम गोर्हे यांनी सांगितले.
विधान परिषदेत मणीपूर बलात्काराचे तीव्र पडसाद उमटले. या प्रकरणी चर्चा करण्याची मागणी काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी केली; मात्र डॉ. नीलम गोर्हे यांनी ‘अनुमती दिलेली नाही; पण बोलायला देत आहे’, असे सांगितल्याने विरोधकांनी गोंधळ घालण्यास प्रारंभ केला. काही आमदारांनी सभापतींसमोरील मोकळ्या जागेत येत केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या.
यावर डॉ. नीलम गोर्हे म्हणाल्या, ‘‘४ मे च्या या घटनेची गंभीर नोंद मी घेतलेली आहे. २० जुलै या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना याविषयी पत्र लिहिलेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणाची नोंद घेतली असून त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत, तसेच महिला सुरक्षिततेविषयी प्रत्येक राज्याने कठोर कायदा करावा, अशी सूचना केली आहे.’’ सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वत:हून नोंद घेतली असल्याचे सांगत या प्रकरणावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यानंतरही विरोधकांचा गोंधळ चालूच राहिला.