नम्र, मृदूभाषी आणि साधकांची प्रेमाने काळजी घेणारे सद़्गुरु नीलेश सिंगबाळ !
हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद़्गुरु नीलेश सिंगबाळ यांचे वास्तव्य वाराणसी सेवाकेंद्रात असते. तेथील साधकांना सद़्गुरु नीलेश सिंगबाळ यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. कु. सुमन सिंह (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के)
१ अ. सद़्गुरु नीलेशदादांनी ‘परिणामकारक आणि भावपूर्ण सेवा कशी करावी ?’ याविषयी सांगणे : ‘सद़्गुरु नीलेश सिंगबाळ यांच्याकडून ‘प्रत्येक कृती योग्य प्रकारे कशी करायची ?, हे शिकायला मिळते. सत्संगांत प्रार्थना केली जाते किंवा भावप्रयोग घेतले जातात. याविषयी ते सांगतात, ‘‘प्रार्थना करतांना किंवा भाववृद्धीसाठी प्रयोग घेतांना पुष्कळ लांबलचक अन् अनावश्यक वाक्ये नसावीत. लहान; पण परिणामकारक आणि भावपूर्ण वाक्यरचना करावी. प्रार्थना सांगतांना मधे मधे थोडेसे थांबून प्रार्थना सांगावी. तेव्हा ‘सत्संगांत उपस्थित असलेले साधकही ती प्रार्थना म्हणू शकतील’, असा विचार करावा.’’
१ आ. सद़्गुरु नीलेश सिंगबाळ यांच्या लहान लहान कृतींतून शिकायला मिळालेली सूत्रे
१. सद़्गुरु दादा जिन्यावरून जातांना किंवा इतर वेळी चालतांना त्यांच्या पायांचा जराही आवाज होत नाही.
२. सद़्गुरु दादा भ्रमणभाषचा उपयोग करतांना एकदम स्थिर राहून आणि सहजपणे करतात. भ्रमणभाषवर बोलतांना ते एकदम सहजतेने आणि आवश्यक तेवढ्याच मोठ्या आवाजात बोलतात.
१ इ. साधकांना प्रेमाने आणि आठवणीने प्रसाद देणे : आम्ही साधक सेवाकेंद्रातून घरी जातो. तेव्हा सद़्गुरु दादा आमच्या घरातील सर्व सदस्यांसाठी आवर्जून प्रसाद देतात. ते गोव्याहून वाराणसीला येतात, तेव्हा आम्हा सर्व साधकांना रामनाथी आश्रमातून आणलेला प्रसाद देतात. एखादा साधक भेटला नाही, तर त्याच्यासाठी प्रसाद राखून ठेवतात आणि तो भेटल्यावर त्याला आठवणीने तो देतात.
१ ई. साधिकेच्या रुग्णाईत पित्याची काळजी घेणे : कोरोनाच्या काळात माझे वडील आजारी होते. तेव्हा सद़्गुरु दादांनी माझ्या वडिलांसाठी आश्रमातील तीर्थ आणि अग्निहोत्राची विभूती दिली. अधूनमधून ते वडिलांच्या प्रकृतीची विचारपूस करायचे आणि वडिलांच्या स्थितीनुसार नामजपादी उपाय विचारून मला सांगायचेे.
१ उ. सद़्गुरु नीलेश सिंगबाळ यांचे कपडे धुणे आणि इस्त्री करणे, या सेवा ६ मास केल्यावर अंतमुर्र्खता वाढून वृत्ती शांत अन् स्थिर होणे : एकदा मला सहा मासांसाठी सद़्गुरु नीलेशदादांचे कपडे धुणे आणि त्यांना इस्त्री करणे, ही सेवा मिळाली. ही सेवा करतांना माझ्याकडून गुरुदेवांचे अखंड स्मरण व्हायचे. त्या वेळी मला माझी वृत्ती शांत, स्थिर आणि अंतर्मुख झाल्यासारखी वाटत होती. एरव्हीच्या तुलनेत या काळात माझ्या सेवेत आणि विचार करण्याच्या वृत्तीतही वाढ झाली होती.’
२. श्री. नीलय पाठक
२ अ. नम्र आणि मृदूभाषी अन् प्रसंगी कणखर असणे : ‘सद़्गुरु नीलेशदादा जेवढे सौम्य, निर्मळ, नम्र आणि मृदूभाषी आहेत, तेवढेच त्यांच्यात क्षात्रतेजसुद्धा आहे. कोणत्याही कठीण परिस्थितीत ते अगदी ठामपणाने उभे रहातात.
२ आ. वाराणसी धर्मसंघाचे महामंत्री पाण्डेय महाराज यांनी ‘सद़्गुरु नीलेश सिंगबाळ यांच्याविषयी काढलेले गौरवोद़्गार ! : वर्ष २०१७ मध्ये वाराणसीच्या धर्मसंघाचे महामंत्री जगजीतन पाण्डेय महाराज यांना ‘सद़्गुरु नीलेशदादा संतपदी विराजमान झाले’, यासंदर्भात सांगितले होते. तेव्हा महाराज म्हणालेे, ‘‘सद़्गुरु दादांचे बोलणे किती नम्र आणि सौम्य आहे. ते पहिल्यापासून संतच आहेत !’’
३. श्री. चंद्रशेखर सिंह
३ अ. प्रेमभाव
३ अ १. कोरोनाचा संसर्ग झाला असतांना साधकाची प्रेमाने काळजी घेणे : ‘मला कोरोनाचा संसर्ग झाला होता. तेव्हा या आजारातून मला वाचवण्यासाठी सद़्गुरु नीलेशदादांनी ‘नामजपादी उपाय सांगणे आणि माझ्या नावाने वाराणसी आश्रमात एक दीप अखंड लावून ठेवणे’, अशा प्रकारे माझी काळजी घेतली. त्यांनी माझ्यासाठी घेतलेले अखंड परिश्रम आणि गुरुदेवांची कृपा यांमुळेच माझे प्राण वाचले.
३ अ २. अडचणीच्या काळात तत्परतेने साहाय्य करणे : एकदा माझ्या कार्यालयातील काही जण माझ्यावर खोटा आरोप ठेवून मला निलंबित करण्याचा प्रयत्न करत होते. सद़्गुरु दादांना या संदर्भात सांगितल्यावर त्यांनी मला लगेच एक मंत्रजप करण्यास सांगितला. मंत्रजपाचा उपाय केल्यानंतर माझ्या सर्व समस्या आपोआप दूर झाल्या.
३ आ. सद़्गुरु नीलेशदादांच्या सहवासामुळे होणारा लाभ ! : मी सद़्गुरु दादांच्या जवळ जाऊन नुसता बसलो, तरी माझ्या मनातील नकारात्मक विचार निघून जातात आणि सकारात्मक विचार येऊ लागतात.’
(सर्व लिखाणाचा दिनांक ६.७.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |