विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून शाळेच्या बसचालकांनी नियमावलीचे काटेकोर पालन करावे ! – पोलीस आयुक्त रितेश कुमार
विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळणार्या बसचालकांवर कारवाई व्हायलाच हवी !
पुणे – शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक हा अतिशय संवेदनशील विषय आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्या बसचालकांनी बस नियमावलीचे काटेकोर पालन करावे, असे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी सांगितले. पोलीस आयुक्तालयात आयोजित शालेय विद्यार्थी वाहतूक जिल्हा सुरक्षितता समितीच्या बैठकीमध्ये ते बोलत होते. या वेळी पोलीस सहआयुक्त, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या वाहतुकीदरम्यान अपघात किंवा इतर धोक्याच्या घटनांना प्रतिबंध व्हावा, यासाठी बसचालकांनी स्कूल बस नियमावलींचे काटेकोर पालन करावे. मुलींची वाहतूक होणार्या बसमध्ये महिला मदतनीस असणे बंधनकारक आहे. बसचे वाहनचालक प्रशिक्षित आणि पूर्वेतिहास चांगला असणारे असावेत. याची निश्चिती शालेय परिवहन समितीने करणे आवश्यक आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी परिवहन विभागाने स्कूल तपासणी केली, यामध्ये दोषी आढळलेल्या, तसेच नियमांचे उल्लंघन केलेल्या बसचालकांकडून २९ लाख ७५ सहस्र रुपयांचा दंड वसूल केला.