लहानग्यांनी केली ‘स्वच्छता’ !
सोलापूर येथील एका वसाहतीलगतच्या मैदानामध्ये अस्ताव्यस्त पडलेल्या कचर्यामुळे लहान मुलांना खेळण्यास अडथळा होत होता. यावर उपाय म्हणून १० ते १२ वर्षांच्या मुलांनी कचरा साठल्याचे छायाचित्र ‘अपलोड’ करून महानगरपालिकेकडे ‘ऑनलाईन’ तक्रार नोंद केली. या तक्रारीची नोंद घेत सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाने घटनास्थळी येऊन परिसराची स्वच्छता केली. यासमवेतच वसाहतीतील १२ कुटुंबांवर दंडात्मक कारवाईही केली. आपल्या तक्रारीची त्वरित नोंद घेऊन कृतीशील झालेल्या कर्मचार्यांना पाहून स्वच्छता मोहिमेमध्ये ही बालकेही उत्स्फूर्तपणे सहभागी झाली आणि संपूर्ण परिसर स्वच्छ झाला. यामुळे तेथील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही ते लाभदायक झाले. खरे तर जे काम मोठ्या व्यक्तींनी करणे अपेक्षित होते, त्या सूत्रावर बालकांनी सतर्कता दाखवली आहे, असे म्हणावे लागेल. या एका उदाहरणावरून सध्याच्या बालकांमधील सतर्कता, उत्साह, परिणामांची जाणीव अशी विविध गुणवैशिष्ट्ये दिसून येतात. त्यामुळे पाल्यांनी आपल्या मुलांना नैतिक मूल्यांविषयी योग्य दिशा दिल्यास हीच बालके उद्या राष्ट्राचे उज्ज्वल भविष्य बनू शकतात, हे लक्षात येते.
‘बालकांनी तक्रार केल्यानंतर जागृत होणार्या पालिकेच्या आरोग्य विभागाच्या हे आधीच लक्षात का आले नाही ?’, हाही प्रश्न महत्त्वाचा आहे. नागरिकांच्या अयोग्य सवयीही याला कारणीभूत आहेत. अनेक ठिकाणी घंटागाडी पोचत नसल्याने किंवा कचरापेटी नसल्यानेही कचरा साठल्याचे निदर्शनास येते. काही ठिकाणी घाणीचे प्रचंड साम्राज्य निर्माण झालेले असते. शहरीकरण वाढत असतांना तेथे महापालिकेच्या सर्व सुविधा वेळेत पोचत नसल्याने हा कचरा सगळ्यांकडूनच दुर्लक्षिला जातो. पालिका प्रशासनाने आणखी किती ठिकाणी अशा प्रकारे कचरा पडलेला आहे ? याची पहाणी करणे, तो स्वच्छ करणे आणि त्यावर कायमची उपाययोजना काढणे अपेक्षित आहे. लहान बालकांनी मनात आणल्यास ते काहीही करू शकतात; मात्र आपल्याकडून कचरा टाकतांना तो ‘अयोग्य ठिकाणी टाकला जात नाही ना ?’, याचाही विचार नागरिकांनी करणे आवश्यक आहे. लहान मुलांमधील ही सतर्कता समाजातील सुजाण नागरिकांमध्ये निर्माण होईल, तेव्हाच अशा समस्या दूर होऊन प्रत्येकाला ‘सत्यम् शिवं सुंदरम्’ जीवन जगता येईल, यात शंका नाही.
– वर्षा कुलकर्णी, सोलापूर