जैन साधूंच्‍या निर्घृण हत्‍याकांडाच्‍या निषेधार्थ मुंबई आणि लासलगाव येथे मौन फेरी

मुंबई, २१ जुलै – जैन समाजाचे विद्वान तपस्‍वी गुरुदेव आचार्य श्री कामकुमार नंदीजी महाराज यांच्‍या निर्घृण हत्‍येच्‍या पार्श्‍वभूमीवर मुंबईतील भुलेश्‍वर परिसरात असलेल्‍या गुलालवाडी मंदिर येथे, तसेच लासलगाव येथे मौन फेरीचे आयोजन करण्‍यात आले होते. मोठ्या संख्‍येने जैन समाज यात सहभागी झाला होता. मुंबई उपनगरांचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा हेही मुंबईतील फेरीत सहभागी झाले होते.

कर्नाटकमधील नंदीजी महाराज यांना ६ ते ७ जुलैच्‍या कालावधीत त्‍यांच्‍या आश्रमात घुसून समाजकंटकांनी मारहाण केली, इलेक्‍ट्रिक शॉक देऊन यातना दिल्‍या आणि त्‍यांच्‍या शरिराचे तुकडे करून फेकून दिले होते.

संपूर्ण देशात जैन साधू आणि साध्‍वी जिथे प्रवास अन् निवास करतील अशा ठिकाणी योग्‍य सुरक्षा व्‍यवस्‍था असावी, त्‍यांच्‍या पदयात्रेदरम्‍यान राजकीय अतिथींप्रमाणे पोलीस संरक्षण मिळावे, असे निवेदन राज्‍यपाल महोदयांना पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या निमित्ताने दिले.

लासलगाव येथे सकाळच्‍या वेळी जैन बांधवांनी त्‍यांची आस्‍थापने बंद ठेवून फेरीत सहभाग घेऊन या घटनेचा तीव्र निषेध व्‍यक्‍त केला.

संपादकीय भूमिका

जैन साधूंचे निर्घृण हत्‍याकांड होणे आणि त्‍याच्‍या निषेधार्थ जैन समाजाला फेरी काढावी लागणे दुर्दैवी !