सोलापूर जिल्‍हा परिषदेमध्‍ये पदमान्‍यतेसाठी शिक्षणाधिकारी घेतात ८ लाख रुपये !

माळशिरस मतदारसंघाचे आमदार राम सातपुते यांचा विधानसभेत आरोप

शिवसेनेचे मंत्री’ दीपक केसरकर आणि भाजपचे आमदार राम सातपुते (छायाचित्र सौजन्य : लोकमत)

मुंबई, २१ जुलै (वार्ता.) – शिक्षण विभाग पुणे उपसंचालक कार्यालय आणि सोलापूर जिल्‍हापरिषद शिक्षणाधिकारी कार्यालय येथे मोठ्या प्रमाणात भ्रष्‍टाचार चालू आहे. चौकशी समिती नेमून येथील शिक्षणाधिकार्‍यांची चौकशी करणार का ?, असा प्रश्‍न माळशिरस मतदारसंघाचे आमदार राम सातपुते यांनी विधानसभेत उपस्‍थित केला. यास उत्तर देतांना शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी याविषयाची गांभीर्याने नोंद घेऊन संबंधितांची समितीच्‍या माध्‍यमातून चौकशी करण्‍यात येईल’, असे आश्‍वासन दिले. या वेळी राम सातपुते यांनी म्‍हटले की, शिक्षणाधिकारी हे महाराष्‍ट्राच्‍या शिक्षण विभागाला काळीमा फासण्‍याचे काम करत आहेत. सोलापूर जिल्‍हा परिषदेमध्‍ये पदमान्‍यतेसाठी जिल्‍हापरिषद शिक्षणाधिकारी ८ लाख रुपये घेतात. याविषयी माझ्‍याकडे तक्रारी प्राप्‍त झाल्‍या आहेत.