अखेर मुंबईत पाणी साठलेच !
मुंबई – गेले ३-४ दिवस अतीवृष्टी होऊनही मुंबईत पाणी साठले नव्हते; मात्र येथे २१ जुलै या दिवशी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने सखल भागांत पाणी साचले. गोरेगाव, अंधेरी, जोगेश्वरी येथे रस्ते जलयम झाले. शीव आणि चेंबूरमध्येही पाणी साचले होते. किंग्ज सर्कल, मिलन सबवे येथेही प्रतीवर्षीप्रमाणे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. दादरमधील पाणी साठलेल्या हिंदमाता परिसराचा मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी आढावा घेतला. त्यावर ‘थोड्याच वेळात यावर उपाययोजना करण्यात येईल’, असे आयुक्तांनी या वेळी सांगितले. नवी मुंबईतही काही ठिकाणी कमरेपर्यंत पाणी साचले होते.
१. ‘भूस्खलनाच्या घटना घडू नयेत; म्हणून मुंबईत काही काळजी घेण्यात आली आहे का ?’, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर ‘‘सर्वेक्षण केले आहे. भांडुप आणि मुलुंड येथील लोकांचे स्थलांतर केले आहे. मुंबईत ४१५ इमारती धोकादायक आहेत. त्यांपैकी ९५ इमारतींतील नागरिकांनी न्यायालयाकडून स्थगिती आदेश आणला आहे’’, अशी माहिती त्यांनी दिली.
२. कुर्ला रेल्वेस्थानकात पाणी साचल्याने हार्बर मार्गावरील रेल्वेगाड्यांवर मोठा परिणाम झाला. वडाळा-मानखुर्द वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे हार्बर स्थानकांवर गर्दी झाली होती. मध्य रेल्वेची वाहतूकही विलंबाने चालू होती. त्यामुळे मुंबईकरांचे हाल झाले.
३. पश्चिम द्रुतगती मार्गावर प्रचंड वाहतूककोंडी झाली. मुंबईत अनेक ठिकाणी वाहतूककोंडीमुळे अडचणी येत होत्या.
४. नरिमन पॉईंटवर उंच लाटा उसळत होत्या.
५. मुंबईतील ७ धरणांमध्ये ४२ टक्के पाणीसाठा आहे.
६. पुढील ४८ घंट्यांत मुंबईत मोठा पाऊस होणार असल्याची चेतावणी देण्यात आली आहे.
भांडुप (मुंबई) येथील दरडप्रवण क्षेत्रातील नागरिकांचे स्थलांतरभांडुप येथील नुकतेच भूस्खलन झालेल्या एका दरडीवर लोक रहात आहेत. येथील ३५ जणांचे स्थलांतर करण्याची प्रक्रिया चालू आहे. तरीही काही नागरिक मात्र येथेच रहात आहेत. पालिकेने रहाण्याची व्यवस्था नीट न केल्याच्या तक्रारीही येथील लोकांनी केल्या आहेत. ‘येथील झाडे कापण्याची अनुमती काढून देऊनही पालिकेने झाडे कापली नाहीत’, अशी तक्रार नागरिकांनी केली. |
राज्यभरातील घडामोडी
मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र सगळीकडेच धुवांधार पाऊस झाला आहे.
१. रायगडमधील कुंडलिका नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन शेतीची हानी झाली आहे. महाड, पोलादपूर येथे जोरदार पाऊस होता. पेणमधून ३५ ग्रामस्थांना स्थलांतरित करण्यात आले आहे.
२. काळजी म्हणून वरंज, आंबेनळी आणि रघुवीर घाट बंद करण्यात आले आहेत.
३. हिंगोली येथील उघडा नदीला पूर येऊन हळद, सोयाबीन, कापूस या शेतपिकांची हानी झाली आहे.
४. ठाणे, पालघर आणि रायगड येथे पुढील २ दिवसांत अतीवृष्टीची चेतावणी दिली आहे.
५. विदर्भालाही पावसाने चांगलेच झोडपले आहे. नांदेड-हैद्राबाद महामार्ग बंद ठेवण्यात आला आहे. गडचिरोली, चंद्रपूर येथेही दमदार पाऊस झाला.
६. चाकारी, यवतमाळ येथे ढगफुटीसदृश पाऊस झाला.
७. भंडारा आणि गोंदिया येथे वीज कोसळून ४ जणांचा मृत्यू झाला, तर २० जण घायाळ झाले आहेत.
८. कोल्हापूरमधील ७० बंधारे पाण्याखाली गेले आहेत.