पंचगंगा नदीच्या पाण्याची वाटचाल धोक्याच्या पातळीजवळ : आंबोलीसह अनेक वाहतूक मार्ग बंद !
कोल्हापूर – गेले ४ दिवस चालू असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदीचे पाणी आता धोक्याच्या पातळी म्हणजे ३९ फुटांकडे वाटचाल करत आहे. २१ जुलैला नदीची पाणीपातळी ३५ फूट ४ इंच नोंदवली गेली. अतीवृष्टीमुळे जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेर जाणारे अनेक मार्ग बंद झाले आहेत. यात प्रामुख्याने कोल्हापूर-पणजी हा आंबोली घाटातून जाणारा मार्ग पूर्णपणे बंद असून गडहिंग्लज, गगनबावडा, आजरा तालुक्यातील काही रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. पोहोळे ते बाजार भोगाव रस्त्यावर पुलाचे पाणी आल्याने कोल्हापूर ते राजापूर राज्य मार्ग बंद करण्यात आला आहे.
इचलकरंजी येथेही पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असून ती सध्या ५८ फुटांपर्यंत पोचली आहे. यामुळे प्रशासनाने तात्काळ दक्षतेच्या उपाययोजना चालू केल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात ८८ गावांना भूस्खलनाचा धोका असल्याने या गावांमध्ये प्रशासनाची पथके कार्यरत ठेवण्यात येणार आहेत. प्रतिदिन सकाळ आणि सायंकाळी ही पथके परिसराची पहाणी करतील. शाहूवाडी तालुक्यातील कांडवण येथील २३ कुटुंबांचे दक्षतेचा उपाय म्हणून स्थलांतर करण्यात आले आहे. दुपारी १२.३० वाजता पडसाळी लघु पाटबंधारे तलाव पूर्ण भरून सांडव्याद्वारे विसर्ग चालू झाला आहे.
सातारा – जिल्ह्यातील कोयना धरणातील पाण्याच्या साठ्यातही झपाट्याने वाढ होत असून सध्या धरणात ४० टी.एम्.सी. पाणीसाठा आहे.