पुणे येथील ‘रुबी हॉल’ मूत्रपिंड प्रत्यारोपण प्रकरणी ‘उच्चस्तरीय चौकशी समिती’ नेमली !
राज्यशासनाचा निर्णय
पुणे – रुबी हॉल रुग्णालयातील मूत्रपिंड प्रत्यारोपण प्रकरणी राज्य सरकारने ‘उच्चस्तरीय चौकशी समिती’ नेमली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश चंद्रकांत भडंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याविषयीचा आदेश नुकताच काढला आहे. ‘रुबी हॉल क्लिनिक’मध्ये २४ मार्च २०२२ या दिवशी झालेल्या अवैध मूत्रपिंड प्रत्यारोपणात रुग्णालयाचा सहभाग होता कि नाही, याची चौकशी समिती करणार आहे. त्यात अनियमितता झाली का ? याचाही शोध समिती घेईल. या प्रकरणी झालेल्या सर्व आरोपांची चौकशी करून वस्तूनिष्ठ अहवाल सादर केला जाणार आहे. असे प्रकार पुन्हा घडू नयेत, यासाठी समिती उपाययोजना सुचवणार आहे. समिती रुग्णालयात आवश्यक असलेल्या कागदपत्रांची छाननी करील.