आपत्ती निवारण दल हवेच !
नेहमीच मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार्या रायगडसह कोकण पट्ट्यातही दरडी कोसळण्याच्या घटना पावसात हमखास घडतातच. वर्ष २०१६ मध्ये येथील सावित्री नदीवरील पूल तुटून बस पाण्यात पडून मोठी दुर्घटना घडली होती. वर्ष २०२१ मध्ये तळीये येथे दरड कोसळून ४४ जण गेले. रायगडमधील विविध नद्यांना पूर येणे, ही प्रतिवर्षीची नित्याची गोष्ट आहे. या सर्व पार्श्वभूमीवर वर्ष २०१९ मध्ये केलेल्या राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या मागणीकडे केंद्राकडून ‘कोकणासाठी ते आवश्यक नाही’, असे आलेले उत्तर आश्चर्यकारक आहे. १५ तालुके असलेल्या रायगड जिल्ह्याचा विस्तारही ७ सहस्र १४८ चौरस कि.मी. इतका मोठा आहे. तसेच याच्या सीमेवर पुष्कळ मोठी समुद्रकिनारपट्टी आहे. इतकेच नव्हे, तर रायगडसह अन्य २ गडही या जिल्ह्यात आहेत. त्यामुळे काही दुर्घटना घडल्यास मुंबईहून अधिकची कुमक येण्यास ३ घंटे तरी वेळ लागू शकतो. याचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्राने राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे पथक कोकणात कार्यरत करावे, अशी नागरीकांची मागणी रास्त आहे. राज्य आणि केंद्र सरकार लवकरात लवकर त्याच्या कार्यवाहीसाठी प्रयत्न करतील, ही अपेक्षा !