बोगस मद्य रोखण्यासाठी राज्यातील मद्याचे ‘लेबलीकरण’ होणार ! – शंभूराज देसाई, उत्पादन शुल्क विभाग

उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई

मुंबई, २१ जुलै (वार्ता.) – महाराष्ट्रात डुप्लिकेट मद्य सिद्ध होत आहे. यामुळे महाराष्ट्रात मद्याचा महसूल बुडतो. उत्तर प्रदेश, देहली, पंजाब येथील राज्यांत मद्यापासून मिळणारा महसुलाचा अभ्यास आम्ही केला आहे. याविषयीचा अहवाल आम्ही लवकरच मुख्यमंत्र्यांपुढे सादर करणार आहोत. बोगस मद्याची विक्री रोखण्यासाठी राज्यातील मद्याचे ‘लेबलीकरण’ करण्यात येईल, अशी माहिती उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी मंत्रालयात दिली.

आमदार अभिमन्यू पवार यांनी २१ जुलै या दिवशी विधानसभेत मद्यबंदीविषयी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देतांना मंत्री महोदयांनी वरील उत्तर दिले. या वेळी भाजपचे आमदार संजय कुंटे यांनी महाराष्ट्रात अन्य राज्यांच्या तुलनेत मद्याचे उत्पादन अधिक आहे. याउलट मद्यामधून मिळणारा कर मात्र अन्य राज्यांच्या तुलनेत अल्प आहे. त्यामुळे मद्याच्या बाटल्यांना ‘लेबलीकरण’ करावे, असे आवाहन केले. यावर बोगस मद्याची निर्मिती, बोगस मद्याची वाहतूक यांविषयी पडताळणी चालू आहे. अवैध मद्याच्या विरोधात उत्पादन शुल्क विभाग आणि गृहविभाग एकत्रित मोहीम राबवली जाईल, असे शंभूराज देसाई यांनी सांगितले.