३१ जुलैपर्यंत रघुवीर घाट बंद रहाणार ! – खेड उपविभागीय अधिकारी राजश्री मोरे
रत्नागिरी – पावसाळ्यामध्ये दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने सदर मार्ग जाण्या-येण्यासाठी धोकादायक होऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये दरड कोसळून मानवी जीवितास धोका उद्भवण्याची शक्यता असल्याने सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून खोपी-शिरगाव येथील रघुवीर घाट ३१ जुलैपर्यंत पर्यटकांकरता बंद करण्यात येत आहे, असा आदेश खेड उपविभागीय अधिकारी राजश्री मोरे यांनी दिला.
खेड तालुक्यातील रघुवीर घाट हा पावसाळ्यातील पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी पावसाळ्यामध्ये पर्यटकांची पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात ये-जा चालू असते; परंतु रघुवीर घाट रस्ता आणि डोंगर भागालगत दरड कोसळण्याची शक्यता असल्याने या ठिकाणी दरड कोसळून जीविहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सद्य:स्थितीत हवामान विभागाने अतीवृष्टीची चेतावणी दिलेली असल्याने खोपी शिरगाव येथील रघुवीर घाट आणि डोंगर भागालगत दरड कोसळून जीवितहानी होऊ नये; यासाठी ठोस उपाययोजना हाती घेणे आवश्यक आहे. सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून खोपी शिरगाव येथील रघुवीर घाट २१ ते ३१ जुलै २०२३ पर्यंत पर्यटनाकरता बंद करण्यात येत आहे.