गुरुदेव डॉ. काटेस्वामीजींचे कार्य अतुलनीय ! – ह.भ.प. लक्ष्मीकांतजी महाराज पाथरीकर
गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचा जयंती सोहळा !
वडाळा महादेव (वार्ता.) – परमपूज्य गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांनी सनातन वैदिक हिंदु धर्मासाठी केलेले कार्य हे अतुलनीय असून त्यांनी लिहिलेले वाड्मय हे धर्मरक्षण आणि धर्म संवर्धनासाठी मैलाचा दगड ठरेल, असे प्रतिपादन भागवतोत्तम ह.भ.प. लक्ष्मीकांतजी महाराज पाथरीकर यांनी केले. श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील नेवासा रोडवरील गुरुदेव आश्रम येथे गुरुदेव जयंती सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्या प्रसंगी ह.भ.प. पाथरीकर महाराज प्रवचनात बोलत होते.
ह.भ.प. पाथरीकर महाराज पुढे म्हणाले, ‘‘पूज्य गुरुदेवांनी आपले संपूर्ण जीवन धर्म आणि संस्कृती यांसाठी समर्पित केले. अत्यंत निर्मोही असे ते व्यक्तिमत्त्व होते. व्रतस्थ जीवन जगून त्यांनी समाजासमोर मोठा आदर्श ठेवलेला आहे. त्यांनी दाखवलेल्या मार्गाने जीवनाची वाटचाल केली, तर भगवंतप्राप्ती झाल्याविना रहाणार नाही.’’
या वेळी संगीत भजन, श्री गुरु पादुकापूजन, तुलादान, मंगल औक्षण, महाआरती आणि महाप्रसाद झाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गुरुदेव भक्त मंडळ आणि गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी पतसंस्था परिवाराने परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी ठाणे, पुणे, मुंबई, संभाजीनगर, नागपूर आणि श्रीरामपूर तालुक्यातील भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.