महिलांनो, ‘लव्ह जिहाद’सारख्या संकटांवर मात करण्यासाठी साधनेविना तरणोपाय नाही !
‘द केरल स्टोरी’सारखे चित्रपट पाहून आणि प्रतिदिन उघडकीस येणार्या ‘लव्ह जिहाद’च्या वार्ता, त्यात फसलेल्या महिला अन् मुली यांची हृदयद्रावक स्थिती वाचून मला भगवंताचे ‘न मे भक्तः प्रणश्यति ।’ (श्रीमद़्भगवद़्गीता, अध्याय ९, श्लोक ३१), म्हणजे ‘माझ्या भक्ताचा नाश होत नाही’, हे सुवचन आठवले. प्रत्यक्ष भगवंताने भगवद़्गीतेत भक्तांना वरील आश्वासन दिले आहे. सभोवतालच्या भयावह परिस्थितीत ‘माझे प्रारब्ध’ म्हणून रडत बसण्यापेक्षा महिलांनी साधना आणि देवाची आराधना केल्यास त्यांना या कठीण परिस्थितीवरही मात करता येऊ शकेल. ‘देव भक्तांचे रक्षण करतोच’, याविषयी देवाने सुचवलेले विचार येथे दिले आहेत.
१. सद्यःस्थितीत झालेले महिलांचे असुरक्षित जीवन !
१ अ. ‘लव्ह जिहाद’चे षड्यंत्र पाहून समाज हादरून जाणे : ‘द केरल स्टोरी’ चित्रपट प्रदर्शित झाल्यावर संपूर्ण भारतात गदारोळ झाला. हिंदु महिलांवर झालेले अमानुष अत्याचार, ‘लव्ह जिहाद’मध्ये फसलेल्या महिला आणि मुली यांच्या हृदय पिळवटून टाकणार्या सत्य घटना पाहून समाज अंतर्बाह्य हादरून गेला.
१ आ. दिवसेंदिवस महिलांचे जीवन असुरक्षित होत जाणे, ‘लव्ह जिहाद’मध्ये फसलेल्या महिला आणि मुली नरकयातना भोगत असणे : साक्षी (चित्रपटातील महिला पात्राचे नाव) किंवा केरळमधील ३२ सहस्र महिलांची दुःस्थिती यांसारख्या घटना हळूहळू बाहेर येत आहेत. एकंदरीत सर्वत्रची स्थिती पहाता महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. रामराज्यात अंगभर दागिने घालूनही महिला सुरक्षित जीवन जगत होत्या. अलीकडची स्थिती पहाता दिवसाढवळ्याही महिला असुरक्षित आहेत. दिवसेंदिवस ही परिस्थिती अजूनच बिघडत चालली आहे.
१ इ. हिंदूंना धर्मशिक्षण आणि त्यांच्यात धर्माभिमान नसल्यामुळे हिंदु मुली ‘लव्ह जिहाद’मध्ये फसत असणे : देव आणि धर्म विसरल्यामुळे महिलांचे समाजातील आदराचे स्थान जाऊन त्यांच्याकडे केवळ उपभोगाच्या दृष्टीकोनातून पाहिले जात आहे. महिलांच्या सुरक्षिततेला जणू ‘लव्ह जिहाद’चे ग्रहण लागले आहे. धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदूंमध्ये धर्माभिमान राहिलेला नाही. त्यामुळे हिंदु मुली ‘लव्ह जिहाद’मध्ये फसत आहेत. नंतर त्या केवळ असाहाय्यपणे यातना भोगण्यासाठी जिवंत शव बनून जगत आहेत. त्यांच्या प्रेमाची परिणती नरकयातनेत होते. सुखी जीवनाची स्वप्ने उराशी बाळगणार्या मुलींची ‘लव्ह जिहाद’मुळे आयुष्ये उद़्ध्वस्त होत चालली आहेत.
१ ई. ‘बाहेर गेलेली मुलगी घरी सुरक्षित परत येईल कि नाही ?’, अशी समाजात धास्ती असणे : समाजाची स्थिती अशी भयावह झाल्यामुळे अनेक कुटुंबे मानसिक तणावात रहात आहेत. ‘बाहेर गेलेली आपली मुलगी घरी सुरक्षित येईल कि नाही ?’, अशी धास्ती पालकांच्या मनात निर्माण झाली आहे. महिलांच्या समोर ‘लव्ह जिहाद’च्या रूपात एक घोर प्रारब्ध उभे ठाकलेे आहे.
‘ही परिस्थिती पहाता महिलांचे रक्षण करणारे कुणीच नाहीका ?’, असा प्रश्न मनात येतो. याचे उत्तर ‘हो’, असे आहे.
२. भक्तांच्या रक्षणासाठी वेळोवेळी देव धावून येत असणे; पण त्यासाठी त्याचा भक्त होणे आवश्यक असणे
संत जनाबाई, संत सखुबाई, संत मीराबाई, संत कान्होपात्रा यांच्या कथा आपण अनेक वेळा ऐकल्या आहेत. त्या संत असूनही त्यांच्यावर संकटे आली.
अ. संत मीराबाई यांना विष देण्यात आले. त्यांनी भगवान श्रीकृष्णाचे नाव घेत विष प्राशन केले आणि त्यातून त्यातरून गेल्या.
आ. एका मोगल राजाने संत कान्होपात्रा यांना आणण्यासाठी ४० शिपाई पाठवलेे होते; पण कान्होपात्रांनी पांडुरंगाला कळवळून हाक मारली. तेव्हा पांडुरंगाने संत कान्होपात्रा यांना स्वतःमध्येच विलीन करून घेतले.
इ. संत सखुबाईं यांना त्यांच्या घरच्यांनी पुष्कळ त्रास दिला.
या संत महिलांनाही प्रारब्धाचे भोग सुटले नाहीत; पण त्यांनी देवाच्या भक्तीच्या बळावर प्रारब्धावर मात केली.
ई. महाभारतातील द्रौपदीचे उदाहरण पुष्कळ बोधप्रद आहे. तिच्या लज्जारक्षणार्थ कुणीही आले नाही. तेव्हा तिने भगवान श्रीकृष्णाला आळवले. भगवान श्रीकृष्णच तिच्या हाकेला धावून गेला आणि त्याने तिचे लज्जारक्षण केले.
या सर्व संकटांतून या महिलांना कुणी वाचवले ? कशाच्या बळावर त्यांनी या संकटांवर मात केली ? केवळ देवच या भक्तांच्या रक्षणार्थ धावून आला. या सर्व महिलाच होत्या; परंतु आपल्या भक्तीच्या बळावर या महिलांनी अनेक कठीणातील कठीण संकटांवरही मात केली. त्यांच्या भक्तीमुळेच देव त्यांच्यासाठी धावून आला.
३. देव भावभक्तीचा भुकेला असल्यामुळे भक्ती केल्यास आताही तो धावून येईलच !
महिलांनो, इतिहासातील या कथा भाकडकथा (निरर्थक गोष्टी) नाहीत किंवा ‘हे केवळ त्यांनाच शक्य होऊ शकते’, असेही नाही. त्यांनी आपल्या सर्वांसमोर भक्तीचा आदर्श ठेवला आहे. त्यांच्याप्रमाणे संकटांना भक्तीने तोंड दिल्यास देव आताही धावून येईल, यात शंका नाही. देव केवळ भावभक्तीचाच भुकेला आहे आणि देवाची भक्ती करण्यापासून आपल्याला कुणीही थांबवले नाही अन् थांबवू शकत नाही. आपणही भगवंताची भक्ती करून भगवंताच्या प्रीतीचा अनुभव घेऊया.
४. सर्वव्यापी आणि सर्वशक्तीमान असलेल्या भगवंताला आर्तभावाने साद (हाक) घातल्यास त्याला भक्ताची साद ऐकू येत असणे
मनुष्याला मर्यादा आहेत. मनुष्य केवळ स्थुलातील गोष्टी पाहू किंवा ऐकू शकतो; परंतु भगवंत सूक्ष्मतम, सर्वज्ञानी आणि सर्वव्यापी आहे. त्यामुळे तो सदैव आपल्या समवेत राहू शकतो. एखाद्या व्यक्तीला आपली हाक काही अंतरापर्यंतच ऐकू येऊ शकते; परंतु भगवंत सर्वव्यापी असल्याने त्याच्यापर्यंत आपली आर्त हाक निश्चितच पोेचू शकते. असे म्हणतात, ‘मुंगीच्या पायातील घुंगरांचा आवाजही ईश्वराला ऐकू येतो’, तर आपण आर्ततेने घातलेली साद त्याला निश्चितच ऐकू जाईल.
५. घोर प्रारब्धावर ‘साधना’ हाच एकमेव उपाय असणे
५ अ. साधनेने देवाच्या भक्तीचे बळ मिळवल्यास जिवाचे रक्षण होऊन त्याचे प्रारब्ध सुसह्य होणार असणे : या घोर प्रारब्धावर एकच उत्तर आहे आणि ते म्हणजे ‘साधना’ ! साधना करून भक्तीचे बळ मिळवल्यास भगवंत आपल्या हाकेला धावून येईल. आपल्या रक्षणार्थ इतर कुणावर अवलंबून रहाण्यापेक्षा देवाची आराधना करून स्वयंपूर्ण होऊया. प्रारब्ध कुणालाही, अगदी संतांनाही चुकलेले नाही; परंतु प्रारब्ध सुसह्य करण्याची, त्यावर मात करण्याची शक्ती केवळ भगवंताच्या आराधनेनेच मिळू शकते.
५ आ. आतापासूनच साधना करून भगवंताची भक्ती केल्यास त्याचा आशीर्वाद लाभेल ! : समाजातील स्थिती पहाता, पुढे येणारी स्थिती अजूनच भयावह असेल. तहान लागल्यावर विहीर खणायची नसते. ती आधीच खणलेली असल्यास तहान लागल्यावर लगेच पाणी मिळते. त्याप्रमाणे महिलांनो, आतापासूनच साधनेला आरंभ करून भगवंताचे आशीर्वाद मिळवण्यास पात्र व्हा; कारण ‘माझ्या भक्तांचा नाश होणार नाही’, असे भगवंताचे वचन आहे; म्हणून भगवंताचे भक्त बनूया, अन्यथा घोर यातनांना सामोरे जाण्याविना पर्याय नाही. महिलांनो, स्वतःचे भवितव्य आपल्याच हातात आहे.
महिलांनो, ‘लव्ह जिहाद’ किंवा अन्य संकटे यांना फसून स्वतःचे आयुष्य उद़्ध्वस्त करून घेण्यापेक्षा स्वतःची साधना वाढवून जीवनाचे सार्थक करा आणि आनंदी व्हा. साधना, म्हणजे भगवंताची भक्ती केल्यास भगवंत तुमच्यावर येणार्या संकटांपासून तुमचे निश्चितच रक्षण करील.’
– सौ. अनघा जोशी (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), फोंडा, गोवा. (११.६.२०२३)
संपादकीय भूमिकाभगवंताची भक्ती केल्यास तो तुमच्यावर येणार्या प्रत्येक संकटापासून भक्तांचे निश्चितच रक्षण करतो ! |