दोषी अधिकार्यांवर कठोरातील कठोर कारवाई करा ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती
हिंदु जनजागृती समितीने मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठामध्ये सरकारीकरण झालेल्या तुळजापूर देवस्थानातील घोटाळ्यांच्या संदर्भात, तसेच देवीचे अलंकार गहाळ झाल्याविषयी याचिका प्रविष्ट केली होती. त्यामध्ये १४० किलो चांदी, १२० किलो सोने आणि अन्य घोटाळ्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी केली होती; परंतु विशेष अन्वेषण पथकाने अहवाल दिल्यानंतर यासंदर्भात केवळ ‘अनियमितता आहे’, असे सांगून गृह विभागाने तपास थांबवला होता. आता पुन्हा देवीचे अलंकार गायब झाल्याचे समोर आल्यानंतर उपसभापती नीलम गोर्हे यांनी यासंदर्भात सध्या झालेल्या सोने आणि मौल्यवान अलंकार यांच्या घोटाळ्यांच्या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केलेली आहे. हिंदु जनजागृती समिती, महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी काही मासांपूर्वी तेथील मंदिर समितीने घेतलेल्या देवीचे दागिने वितळवण्याच्या निर्णयाला विरोध केलेला होता. या पाठीमागे अलंकारांतील झालेला घोटाळा लपवण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित अधिकार्यांवर, दोषी अधिकार्यांवर कठोरातील कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समिती करत आहे.