माणच्या दुष्काळावर तोडगा कधी ?
सातारा जिल्ह्याची पर्जन्यस्थिती अत्यंत विचित्र आहे. सातारा हा एकमेव असा जिल्हा आहे की, जेथे अतीवृष्टी आणि दुष्काळ एकाच ठिकाणी पहायला मिळतो. महाराष्ट्राचे चेरापुंजी (सर्वाधिक पाऊस पडणारे मेघालयमधील शहर) म्हणून ओळख असणार्या महाबळेश्वर तालुक्यातील नवजा येथे राज्यातील सर्वाधिक पाऊस नोंदवला जातो, तर दुसर्या बाजूला माण तालुक्यात राज्यातील सर्वाधिक दुष्काळग्रस्त भाग म्हणून नोंद केली जाते. माण तालुक्यात डिसेंबर-जानेवारी पासून टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. चांगला पाऊस चालू झाला की, सातारा जिल्ह्याला नेहमीच अतीदक्षतेची चेतावणी (रेड अलर्ट) दिली जाते; मात्र माण तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागते. माण तालुक्यात १० तलाव असून त्यांची पाणी साठाची एकूण क्षमता ३५.३५ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. यांपैकी उपयुक्त पाणीसाठा २९.८७ दशलक्ष घनमीटर असून सध्या तलावांमध्ये ४.६८ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. येथील ४ तलाव अजूनही कोरडे, तर २ तलावांत १० टक्क्यांहून अल्प पाणीसाठा शिल्लक आहे. अन्य तलावांतही अत्यल्प पाणीसाठा शिल्लक आहे. माण तालुक्यात पावसाने ओढ दिल्यामुळे ओला चारा, कडबा यांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. ‘स्वत:जवळचे पशूधन जगवायचे कसे ?’, या विवंचनेत तेथील शेतकरी जगत आहे. पशूधन वाचवण्यासाठी शेतकरी सरकारकडे चारा छावण्या चालू करण्यासाठी साकडे घालत आहेत. सध्या माण तालुक्यात ३० हून अधिक गावे यांमध्ये आणि वाड्या-वस्त्यांवर टँकरने पाणीपुरवठा चालू आहे. पाण्याच्या दुर्भिक्षामुळे अनेक वेळा नागरिकांमध्ये वादविवादाचे प्रसंग घडत आहेत, तसेच काही शेतकर्यांचे पशूधन दगावत आहे. सरकारने या समस्येकडे गांभीर्याने पहाणे आवश्यक आहे.
जलयुक्त शिवार योजनेमुळे येथील अनेक गावे पाणीदार झाली; मात्र दुष्काळ कायमचा संपला नाही. अजूनही अनेक गावात जलसंधारणाची कामे होणे आवश्यक आहे. टँकरने पाणीपुरवठा आणि चारा छावण्या चालू करून ठेकेदार पोसण्याऐवजी सरकारने या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे, तसेच गावकर्यांनीही एकत्र येऊन सरकारकडे त्यासाठी पाठपुरावा करावा !
– श्री. राहुल देवीदास कोल्हापुरे, सातारा