आतंकवादाचा अंत कधी ?
पुण्यात पोलिसांच्या सतर्कतेमुळे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेला (एन्.आय.ए.ला) हवे असलेल्या २ आतंकवाद्यांना पकडण्यात यश आले. या आतंकवाद्यांना पकडणार्यांना ५ लाख रुपयांचे बक्षीस घोषित करण्यात आले होते. इम्रान खान आणि महंमद युनूस साकी अशी या २ अटक करण्यात आलेल्या आतंकवाद्यांची नावे आहेत. हे दोघे ‘अल् सुफा’ या आतंकवादी संघटनेसाठी कारवाया करतात. आतापर्यंत आपण अल् कायदा, लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनांची नावे ऐकली आहेत. त्यात ‘अल् सुफा’ या आतंकवादी संघटनेची भर पडली आहे. या संघटनेचे नाव समोर आले ते ३० मार्च २०२२ या दिवशी. राजस्थानमध्ये घातपाती कारवाया करण्याचे षड्यंत्र या संघटनेने रचले होते. एका चारचाकी गाडीची झडती घेतल्यावर पोलिसांना स्फोटके सापडली होती. त्या वेळी बशीर खा शेरानी याला अटक केली होती; मात्र इम्रान खान, महंमद युनूस साकी आणि फिरोज पठाण हे तिघे पसार झाले होते. मागील दीड वर्ष सुरक्षायंत्रणा त्यांना शोधत होती. आताही खान आणि साकी यांना अटक झाली असली, तरी पठाण पसार झाला आहे.
या घटनेनंतर पहिला प्रश्न मनात येतो, तो असा की, राजस्थानमध्ये कारवाया करण्यासाठी प्रयत्न करणारे आतंकवादी पुण्यात कसे ? अल् सुफा या आतंकवादी संघटनेचे जिहादी मध्यप्रदेशातील रतलाम येथेही जिहादी तळ चालवत होते, अशी माहिती पुढे आली आहे. येथेही सुरक्षायंत्रणांनी धाड टाकली. यावरून या संघटनेने भारतात ठिकठिकाणी हात-पाय पसरल्याचे समोर येते. ही धोक्याची घटना आहे. भारतात पूर्वीप्रमाणे बाँबस्फोट होत नाहीत; मात्र समाजविघातक कारवायांमध्ये वाढ झाली आहे. स्फोट घडवून लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याऐवजी दंगली घडवणे, हिंदूंचा शिरच्छेद करणे, त्यांची अमानुष हत्या करणे यांसारख्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यावरून ‘आतंकवादी कारवायांचे स्वरूप पालटले आहे’, असे आपण म्हणू शकतो. ही भारतीय सुरक्षायंत्रणांसाठी धोक्याची घंटा आहे. आतंकवाद्यांच्या अड्ड्यांवर धाड टाकून, ४-५ आतंकवाद्यांना अटक करून भारतातील आतंकवाद संपेल का ? आतंकवाद संपवण्यासाठी प्रथम आतंकवाद्यांच्या पाठीराख्यांना शोधून त्यांच्यावर कारवाई करावी लागेल. काश्मीर काय किंवा देशातील अन्य ठिकाणे काय, आतंकवाद्यांना स्थानिक पाठिंबा असल्याविना त्यांना कारवाया करण्याचे धाडस होणार नाही. भारतात अनेक ठिकाणी छोटी पाकिस्ताने निर्माण झाली आहेत. या अड्ड्यांवर कारवाया केल्यास राष्ट्रघातक्यांवर जरब बसेल. अशाने आतंकवाद्यांना शोधून त्यांच्यावर कारवाया करणे सोपे जाईल. या सर्व सूत्रांचा आढावा घेता सुरक्षायंत्रणांचे काम वाढले आहे. भारतात कारवाया करणारे धर्मांध, त्यांना चिथावणारे त्यांचे धार्मिक नेते अशांवर प्रथम धडक कारवाई करावी. आतंकवाद नष्ट करण्याच्या दृष्टीने टाकलेले हे जोरकस पाऊल असेल .