पणजी ‘स्मार्ट सिटी’ची आतापर्यंत ३३ टक्के कामेच पूर्ण ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत
गोवा विधानसभा अधिवेशन
पणजी, २० जुलै (वार्ता.) – पणजी ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाची आतापर्यंत ३३५ कोटी रुपये खर्चाची ३३ टक्के कामेच पूर्ण झालेली आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिली.
(सौजन्य : OHeraldo Goa)
विरोधक सातत्याने ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पावरून पणजी शहराला नावे ठेवत असल्याने त्रस्त झालेले मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, ‘‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाची १०० टक्के कामे पूर्ण झाल्यावर पणजी शहर ‘स्मार्ट’ दिसेल. चालू वर्षअखेरपर्यंत ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाची सर्व कामे पूर्ण होणार आहेत.’’
(सौजन्य : Prudent Media Goa)
विरोधी पक्षांनी २० जुलै या दिवशी विधानसभेत पुन्हा ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाच्या दर्जाहीन कामांमुळे सरकारला धारेवर धरले. या प्रकल्पाच्या कामांमध्ये झालेल्या गैरकारभाराच्या प्रकरणी निवृत्त न्यायाधिशांच्या वतीने अन्वेषण करण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली. याप्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाची कार्यवाही करतांना प्रारंभी काही तक्रारी होत्या. या प्रकरणी ‘स्मार्ट सिटी’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकार्यांच्या विरोधात दक्षता खाते आणि पोलीस यांच्याकडे तक्रारी करण्यात आलेल्या आहेत आणि या प्रकरणी जलद गतीने अन्वेषणाचे आदेश देण्यात आले आहेत. संबंधित कंत्राटदारालाही ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठवण्यात आली आहे.’’
(सौजन्य : Goa Forward Party)
विरोधकांनी पावसात ‘स्मार्ट सिटी’ची कामे करण्यात येऊनही पणजीमध्ये पावसात पूरसदृश स्थिती निर्माण झाल्याविषयी विचारले असता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘विरोधक पुरासंबंधी सांगत आहेत आणि वास्तविक हा समुद्रात आलेल्या भरतीचा परिणाम आहे. पाणी साचून रहाण्याचा प्रश्न ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाच्या माध्यमातून सोडवण्यात येणार आहे.’’