कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी टोरंटो येथील स्वामीनारायण मंदिराला दिली भेट !

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो आणि महंत स्वामी महाराज

टोरंटो (कॅनडा) – कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी नुकतीच येथील बी.ए.पी.एस्. श्री स्वामीनारायण मंदिराला भेट दिली. त्यांनी कॅनडा दौर्‍यावर असलेल्या प.पू. महंत स्वामी महाराज यांची भेट घेतली. बी.ए.पी.एस्.च्या संचालक मंडळाने पंतप्रधान ट्रुडो यांचे स्वागत केले. मंदिराच्या आत ट्रूडो यांनी महंत स्वामी महाराज यांची भेट घेतली. त्या वेळी महंतांनी पुष्पहार घालून ट्रुडो यांचा सत्कार केला. महंत स्वामी महाराजांनी पंतप्रधानांच्या मनगटाभोवती ‘नाडा छडी’ हा पवित्र धागाही बांधला. हा धागा एकता आणि मैत्री यांच्या सामायिक मूल्यांचा प्रतीक मानला जातो.

मंदिरातील पवित्र वातावरणात पंतप्रधान ट्रुडो यांनी सर्व कॅनेडियन लोकांच्या समृद्धी आणि कल्याणासाठी प्रार्थना केली. ते श्री नीलकंठ वर्णीच्या अभिषेक विधीत सहभागी झाले. त्यानंतर त्यांनी सभामंडपात जाऊन भक्त आणि हितचिंतक यांच्या मेळाव्याला संबोधित केले. पंतप्रधान ट्रुडो यांनी बी.ए.पी.एस्. मंदिर समुदायाचे आभार मानले.

संपादकीय भूमिका

कॅनडामध्ये खलिस्तानवाद्यांकडून मंदिरांवर, तसेच हिंदूंवर आक्रमण केले जाते. ट्रुडो या खलिस्तानाद्यांचे समर्थन करतात. त्यामुळे ट्रुडो यांनी हिंदूंच्या मंदिराला भेट देणे, हा देखावा आहे ! कॅनडातील हिंदु समुदायाची मते मिळवण्यासाठी अशी कृती करणार्‍या ट्रुडो यांना तेथील हिंदूंनी खडसावणे आवश्यक !