शाळांची दुरवस्था !
‘शाळेभोवती तळे साचले आणि पाणी झाले अन् शाळेला सुटी मिळाली; तरी पाणी ओसरल्यावर परत शाळा भरणारच आहे आणि शाळेत जावे लागणारच आहे’, ही गोष्ट शहरी मुलांसाठी कदाचित् शाळांमध्ये जाणे मुलांसाठी सुखदायक असेलही; परंतु आज शहराला लागून असलेल्या अनेक छोट्या गावांमध्ये शाळांची दुरवस्था पाहिली, तर ‘मुलांनी शिक्षण तरी कसे घ्यायचे ?’, असा प्रश्न सहज कुणालाही पडेल. वसई तालुक्यातील (पालघर) ६७ शाळांचे छत गळत आहे, तसेच काही ठिकाणी ते आता कि नंतर पडेल ? अशी छतांची स्थिती आहे. अशा वर्गांमध्ये बसणार्या मुलांच्या पालकांच्या जिवाला किती घोर लागेल, याची कल्पना करता येईल. मुलांनीही दिवसभर ओलेत्यात राहून शिकणे कठीण आहे. पालघर जिल्ह्यामधील काही शाळांचा वीजपुरवठा देयके न भरल्याने खंडित केला आहे, तर काही शाळांत माध्यान्ह भोजनही दिले जात नाही. काही शाळांमध्ये शिक्षकही नाहीत. काही जण ‘शाळेपर्यंत निधी पोचत नाही’, असे सांगतात, तर तलासरी (जिल्हा ठाणे)सारख्या काही ठिकाणी निधी मिळूनही काही उपयोग होत नाही, असे चित्र आहे.
‘आदिवासी भागात असणार्या आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या शाळेसाठी पाठवला जाणारा निधी हा त्यांच्यापर्यंत न पोचता मधल्यामध्येच गायब होतो’, अशी वृत्ते प्रसिद्ध होतात. या आश्रमशाळांत मुलांना भोजन मिळत नाही, अशी स्थिती अनेकदा असते. रायगडमधील माणगाव येथील आदिवासी भागामध्ये शाळा नादुरुस्त असल्याने शिक्षकांना शिकवणे अवघड झाले आहे. शिक्षकांना छत्री घेऊन शिकवण्याची वेळ येत आहे. मुसळधार पावसात, अत्यल्प शिक्षक असतांना शिकणे आणि शिकवणे दोन्हीही अवघड झाले आहे. रायगड जिल्ह्यात १ सहस्र ८०० शिक्षकांची पदे रिक्त आहेत. अशा एक ना अनेक गोष्टी आहेत. खेड्याप्रमाणे शहरातील शाळांची स्थितीही गंभीर आहे. नवी मुंबईच्या महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांकडे शैक्षणिक साहित्य नसूनही शाळा चालू करण्यात आल्या आहेत. ठाणे शहरातील महापालिकेच्या शाळांतील पायाभूत सुविधांच्या अभावामुळे शाळांचा दर्जा खालावत चालल्याचे तज्ञांचे मत नाही. त्यामुळे महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या शाळा, तसेच आश्रमशाळा यांचा दर्जा राखण्यासाठी शिक्षण विभाग नेमके काय आणि कशा उपाययोजना करणार आहे ? हेत्यांनी सांगायला हवे, अशी शिक्षक आणि पालक यांची अपेक्षा आहे.
– सौ. रूपाली वर्तक, सनातन आश्रम, देवद, पनवेल.