पावसाळ्याच्या कालावधीत लहान मुलांची घ्यावयाची काळजी !
वातावरणातील पालट, हवेतील ओलेपणा आणि साथीचे रोग, हे हातात हात घालून येतात, हे आपण सर्व जाणतोच. घरातील लहान मूल सतत आजारी राहू लागले, तर ते त्रासदायक होते. लहान वय हे मुळात कफप्रधान असल्याने कफाचे त्रास जसे सर्दी, खोकला, त्यातून उद़्भवणारी लक्षणे (वजन कमी होणे, भूक मंदावणे, चिडचिड) ही पुढे महिना महिना टिकू शकतात. ते टाळण्यासाठी काही सोपे उपाय येथे देत आहे.
१. मुलांना सकाळची शाळा असेल, तर आवर्जून प्रतिदिन सकाळी अंघोळ करून पाठवायचेच, असा अट्टाहास नको.
२. मोजे, बूट कोरडे असावेत. केस ओले असल्यास नीट पुसावे. हवे तर थोड्या प्रमाणात ‘हेअर ड्रायर’चा (केस वाळवण्याच्या यंत्राचा) वापर करावा.
३. कफ साठायची प्रवृत्ती असल्यास छाती, तळपाय आणि टाळू यांना प्रतिदिन वेखंड पावडर लावावी.
४. दही, फळे, पालेभाज्या, शहाळे पाणी हे पावसाळ्यात पूर्ण बंद करावे.
५. मूल १-३ वर्षांचे असतांना त्याला रात्रीच्या जेवणानंतर वा जेवणाच्या ऐवजी दूध पिण्यास द्यायला नको. मूल लहान असल्यास आणि दुधाची सवय असल्यास दुधात चिमूटभर सुंठ घालून मग ते पिण्यास द्यावे.
६. ‘सितोपलादि’ चूर्ण घरात ठेवावे. नेहमीच सर्दी होण्याची प्रवृत्ती असल्यास ते प्रतिदिन सकाळी मधातून २-३ चिमूट चाटायला देण्यास हरकत नाही.
७. भूक मंद असतांना मुद्दाम बदाम, पिस्ता, फळे, अंडी असे ‘पौष्टिक’ पदार्थ बळजोरीने खायला देऊ नये. ‘च्यवनप्राश’ हे सर्दी, खोकल्यावरचे औषध नाही. वारंवार सर्दी, खोकला होत असेल, तर त्या त्रासाची प्रवृत्ती न्यून करून वैद्यकीय सल्ल्याने ‘च्यवनप्राश’ चालू करावे.
८. लहान मुले ‘खायला नको’, म्हणत असतील, तर धाकाने किंवा टीव्हीचे आमीष देऊन खायला देऊ नये; पण त्याच वेळी हा कटाक्ष ठेवावा की, ते अन्य कुठलेही अनावश्यक पदार्थ खाणार नाहीत.
९. कफ अधिक असल्यास दहीभात, नुसता भात, उडीद, मासे, दहीवडा अजिबात देऊ नये. रात्रीचे जेवण ८ वाजेपर्यंत झाले पाहिजे. खाण्यामध्ये मैदा, चीज, मेयो हे पदार्थ न्यूनतम असावेत. तळकट तेलकट पदार्थ देऊ नयेत आणि द्यायचे झाल्यास दुपारी ४ वाजण्याच्या आधी थोडे द्यावेत.
१०. अंतर्वस्त्रे, बनियन आणि अन्य वस्त्रे नीट कोरडी असावीत. कपडे ओलसर असले, तर ते इस्त्रीने गरम आणि कोरडेकरून घ्यावेत.
११. रात्री पंख्याखाली मुलांना झोपवू नये. कोपर्यात झोपवावे.
१२. संध्याकाळी घरात कोळशावर तूप, वेखंड, धूप, कडुनिंब पाने टाकून धूर करून कोपर्या कोपर्यातून फिरवावा. याला ‘धूपन’ असे म्हणतात. या योगे संसर्गजन्य आजार आटोक्यात रहायला साहाय्य होते, तसेच डासांचा उपद्रव न्यून होऊ लागतो.
१३. मूल वरचेवर आजारी पडत असल्यास आयुर्वेदाच्या औषधांचा अत्यंत चांगला उपयोग आजारी असतांना आणि तो परत होऊ नये, अशा दोन्ही वेळी होतो. सतत होणार्या सर्दी आणि खोकल्यामागे कधी कधी कृमी (जंत) हे लक्षणही असते. सर्दी, खोकल्यासह जंतांसाठीही दिलेली औषधे कायमस्वरूपी आजाराला प्रतिबंध घालतात. तसेच याविषयी जवळच्या वैद्यांचा सल्ला अवश्य घ्यावा.
– वैद्या स्वराली शेंड्ये, आयुर्वेद तज्ञ, पुणे. (११.७.२०२३)