राज्यभर मुसळधार पाऊस !
♦ अनेक जिल्ह्यांत पूरसदृश स्थिती ♦ मुंबई आणि नागपूरसह महाराष्ट्रात १२ आपत्कालीन पथके कार्यरत
♦ पुढील ५ दिवस पावसाचा अंदाज ♦ रायगड आणि पालघरमध्ये अतीदक्षतेची चेतावणी !
पनवेल – मुसळधार पावसामुळे रायगड, तसेच पालघर या जिल्ह्यांना ‘अतीदक्षते’ची (रेडलाईट) चेतावणी देण्यात आली आहे. ठाणे, मुंबई, रत्नागिरी येथे ‘ऑरेंज’अलर्टची चेतावणी दिली आहे. मुंबई-अहमदाबाद मार्गावर पाणी साचले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकार्यांकडून पावसाच्या परिस्थितीचा अहवाल मागवला आहे. मुंबई आणि नागपूरसह महाराष्ट्रात १२ आपत्कालीन पथके कार्यरत झाली आहेत.
पावसामुळे रेल्वेसेवा विस्कळीत !पावसाच्या दमदार हजेरीचा लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही परिणाम झाला. २० जुलै या दिवशीच्या पुण्यातून येणार्या एक्सप्रेस रहित करण्यात आल्या आहेत. कोल्हापूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गाडी पुण्यात थांबवण्यात आली होती. अंबरनाथ पूर्व भागातील मुख्य नाला धोकादायक स्थितीत असून या नाल्यातील पाण्याचा प्रवाह एवढा अधिक होता की, अंबरनाथ आणि बदलापूर या रेल्वेस्थानकांच्या मध्यावर असलेल्या रेल्वे रुळांखालील खडी वाहून गेली. हा रेल्वे मार्ग धोकादायक झाल्याने या ठिकाणची रेल्वेवाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. डोंबिवली ते कसारा, कर्जतपर्यंत पूर्णपणे ठप्प झाली होती. मुंबई ते डोंबिवली एवढीच रेल्वे वाहतूक चालू होती. ठाणे स्थानकावर दुपारी ४ च्या सुमारास प्रचंड गर्दी झाली होती; कारण तोपर्यंत दीड घंटा गाड्या बंद होत्या. त्यामुळे उपनगरांतील फलाटांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली. सायंकाळनंतर डोंबिवली येथून गाड्या हळूहळू चालू झाल्या. |
रायगड जिल्ह्यात येथील सावित्री नदीला पूर आला आहे. पेण ग्रामीण भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पेण, पनवेल, उरण तालुक्यातील गावांचा संपर्क तुटला आहे. येथील घरांमध्ये पाणी शिरले आहे. भातशेती पाण्याखाली जाण्याची भीती आहे. सावित्री नदीचे पाणी साडेसहा फूट अधिक वाढले असून तिने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पाताळगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. आपटा, रसायनी येथे पूरस्थिती आहे. आपटा गावाची नदीच झाली आहे. धुवांधार पावसाने रायगड जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे. महाड मार्ग बंद करण्यात आला आहे. नेरळ कळंब रस्ता बंद करण्यात आला. उल्हास नदीचे पाणी वाढले. महाड, पोलादपूर, माणगाव येथे एन्.डी.आर्.एफ्.ची (राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक) पथके तैनात आहेत.
मुंबईत १२० मि.मी. पाऊस झाला आहे. मरीन ड्राईव्हवर भरतीच्या मोठ्या लाटा उसळत होत्या. वसई-विरार भागात पावसाने धुमाकूळ घातला आहे. येथील वालधुनी नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे.
चंद्रपूर आणि गडचिरोली येथे १०० ते १५० गावांचा संपर्क तुटला आहे. चंद्रपूर येथे ९ घंट्यांत २६० मि.मी पाऊस झाला. रत्नागिरी आणि चिपळूण येथे ‘पाणी पहायला जाऊ नका आणि वाहतूककोंडी करू नका’, अशा सूचना प्रशासनाकडून ध्वनीक्षेपकाद्वारे देऊन जागृती करण्यात येत होती. चिपळूणच्या चिंचनाका परिसरात गुडघाभर पाणी होते. दापोली येथील तहसील कार्यालयात कर्मचारी पुराच्या पाण्यामुळे अडकले. आपत्ती व्यवस्थापनाचे कर्मचारीही तेथे अडकून पडले. जगबुडी नदीने पुराची पातळी ओलांडली आहे. खेड येथील बाजारपेठेतील साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने व्यापार्यांची हानी झाली. येथील २० गावांचा संपर्क तुटला आहे. बचावकार्य चालू आहे. नारंगी नदीलाही पूर आला आहे. जिल्ह्यातील अन्य नद्याही दुथडी भरून वहात आहेत. शासनाने शाळांना सुटी घोषित केली.
जळगावमधील रावेर येथील नाल्यांना नद्यांचे स्वरूप आले आहे. अनेक ठिकाणी घरांत पाणी शिरले आहे. येथील बोदवड तालुक्यात मका आणि कापूस पिके वाहून गेली. संततधार पावसाने शेतीच्या पिकांची हानी झाली आहे. शेतांत तळी झाली आहेत. जामोद येथेही पावसाचा पुष्कळ जोर आहे.
लातूरमध्ये २ दिवसांच्या पावसाने खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. दुबार पेरणीचे संकट टळले आहे. कल्याण-नगर महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली.
पावसामुळे ठाणे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत
ठाणे शहरासह कल्याण, भिवंडी, बदलापूर, अंबरनाथ येथे प्रचंड पाऊस होत आहे. मागील २४ घंट्यांत ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी आणि ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले.
ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी भागांतील सखल भागांत पाणी साचले. डोंबिवली स्थानकाचा परिसर पाण्याखाली गेला होता. अनेक ठिकाणी मोठी झाडे कोसळून पडली, तर काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. रेल्वेसथानकाच्या परिसरातील दुकानांतही पाणी शिरले.
कल्याणमध्ये बैलबाजारकडे जणार्या मुख्य रस्त्यावर पाणी साचले होते. भिवंडी-निजामपूर शहर महानगपालिकेच्या हद्दीतील टेमघर स्मशानभूमी परिसरातील नाल्यामध्ये सुजाता कदम ही १४ वर्षीय मुलगी वाहून गेल्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे. कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागातील काळू आणि उल्हास या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. या नद्यांचे पाणी परिसरातील गावांमध्ये घुसले आहे. गावांना जोडणारे अंतर्गत पूल पाण्याखाली गेल्याने गावांचा संपर्क तुटला. कल्याण-नगर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने बदलापूर येथील हेंद्रेपाडा, मांजर्ली, वालीवली, सोनिवली परिसरातील नागरिकांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे. कल्याण-कर्जत रेल्वेसेवा बंद करण्यात आली. उल्हासनगरमध्ये पाणी साचले. भिवंडीमध्ये तीन बत्ती, भाजी बाजार परिसरात कमरेपर्यंत पाणी साचले आहे. ठाकुर्ली ते कल्याण रेल्वेमार्गावर गाडी थांबल्याने एक महिला ४ मासांच्या बाळाला घेऊन बाळाच्या काकासमवेत गाडीतून उतरत होती. तिच्या डब्याखाली नाला वहात होता. उतरतांना काकाच्या हातून बाळ नाल्यात पडल्याची हृदयद्रावक घटना घडली.
पश्चिम महाराष्ट्रात दोन दिवसांपासून संततधार : पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ !
कोल्हापूर – पश्चिम महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार असून पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी २५ फूट (इशारा पातळी ३९ फूट) नोंदवली गेली असून एकूण ३३ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. सतत पडणार्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राधानगरी धरण ५५ टक्के, दूधगंगा धरण २३ टक्के भरलेले आहे. जिल्ह्यातील महत्त्वाचे असलेले वारणा धरण ५० टक्के म्हणजे १७.११ टी.एम्.सी. भरलेले आहे. जिल्ह्यात गडहिंग्लज तालुक्यात संततधार असून हिरण्यकेशी नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. १८ जुलै या दिवशी साळगाव बंधारा पाण्याखाली गेला.
मुसळधार पावसात पर्यटनासाठी रांगणा गड येथे गेलेल्या ८० जणांना स्थानिक ग्रामस्थ आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानांनी सुखरूपणे बाहेर काढले. जवळपास ६ घंटे हे सर्व पर्यटक परतीच्या मार्गावर असणार्या तांब्याचीवाडी ओढ्याला पूर आल्याने अडकले होते. अतीवृष्टीमुळे रांगणा गड हा पर्यटनासाठी बंद करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातील कोयना धरणात मात्र केवळ ३१.१० टी.एम्.सी. (क्षमता १०५ टी.एम्.सी.) पाणीसाठा असून सांगली येथे आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाण्याची पातळी केवळ ८ फूट (इशारा पातळी ४० फूट) इतकी नोंदवली गेली.