देवतांची भूमिका करणार्या कलाकारांचा आध्यात्मिक स्तरावर अभ्यास करतांना लक्षात आलेली सूत्रे
या लेखात ‘श्रीकृष्ण’ ही भूमिका साकारलेल्या पूर्वीच्या आणि अलीकडच्या काही दूरदर्शनवरील मालिका यांचा तुलनात्मक अभ्यास केला आहे. ज्यांच्या अभिनयातून कृष्णतत्त्व अनुभवता येते, अशा श्री. सर्वदमन बॅनर्जी, श्री. नितीश भारद्वाज आणि श्री. सौरभ राज जैन या कलाकारांचा अभ्यास केला आहे. १३ जुलै २०२३ या दिवशी या लेखातील काही भाग आपण पाहिला. आज पुढील भाग पाहू.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/700994.html
५ आ. बी.आर्. चोप्रा दिग्दर्शित ‘महाभारत’ मालिकेत कृष्णाची भूमिका साकारणारे श्री. नितीश भारद्वाज !
५ आ १. भगवान श्रीकृष्ण आणि श्री. नितीश भारद्वाज यांच्यात जाणवलेले साम्य ! : बी.आर्. चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘महाभारत’ मालिकेत प्राण्यांचे आधुनिक वैद्य असलेले मराठमोळे अभिनेते श्री. नितीश भारद्वाज यांनी कृष्णाची भूमिका साकारली आहे. गोड हास्य आणि मधुर संवाद यामुळे प्रेक्षकांची मने जिंकणार्या श्री. भारद्वाज यांनी श्रीकृष्णाची भूमिका उत्तमप्रकारे साकारली असून त्यांनी गीतेचे तत्त्वज्ञान दैनंदिन आचरणातही आणले आहे. श्री. भारद्वाज आणि श्रीकृष्ण यांचे जन्मनक्षत्र आणि रास एकच आहे. त्यांचे बालपण श्रीकृष्णाप्रमाणे गाईंच्या समवेत गेले.
५ आ २. ज्येष्ठ अभिनेते श्री. मुकेश खन्ना यांनी श्री. नितीश भारद्वाज यांची घेतलेली मुलाखत !
५ आ २ अ. ‘आध्यात्मिक ग्रंथांच्या वाचनामुळे ‘श्रीकृष्णा’च्या भूमिकेमागील आध्यात्मिक पार्श्वभूमी सिद्ध झाली’, असे श्री. नितीश भाद्वाज यांनी सांगणे : ‘यू ट्यूब’वर अभिनेते मुकेश खन्ना यांनी घेतलेल्या एका मुलाखतीत श्री. नितीश भारद्वाज यांनी त्यांची आध्यात्मिक पार्श्वभूमी स्पष्ट केली. त्या मुलाखतीत ते म्हणतात, ‘‘माझ्या आईकडून मला अध्यात्माविषयी पुष्कळ ज्ञान मिळाले असून बालवयात श्रुंगेरी मठाशी संलग्न असलेल्या आमच्या येथील एका मठातून मी वेदांतातील अद्वैत तत्त्वज्ञान शिकलोे; मात्र श्रीकृष्णाची भूमिका साकारल्यावर माझा जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोनच पालटला आणि अंतरातून खरे परिवर्तन झाले. माझ्या जीवनात अनेक चढउतार आले; पण ‘जीवनाची परीक्षा कशी द्यायची ?’, हे मी श्रीकृष्णाकडून शिकलो. गीता तुम्हाला जीवनातील प्रत्येक समस्येतून बाहेर काढू शकते. ‘जीवनाने शिकवले आणि श्रीकृष्णाने उभारी दिली’, असे थोडक्यात सांगता येईल.
५ आ २ आ. एखादा कठीण प्रसंग आल्यावर ‘श्रीकृष्णाने परिस्थिती कशी हाताळली असती ?’, असा विचार करून परिस्थितीवर मात करणे : मी गीता आणि ज्ञानेश्वरी यांचे वाचन केले आहेे; मात्र ‘श्रीकृष्णा’ची भूमिका केल्यानंतर ती मला खर्या अर्थाने कळली. जीवनात कठीण प्रसंग आल्यावर मी गीता पुन्हा वाचतो आणि तेव्हा मला त्यातील वाक्यांची अनुभूती येते. आताही मला अनुभूती येतात. आता ‘माझ्या जीवनात एखादी घटना घडल्यावर ‘भगवान श्रीकृष्णाने ही परिस्थिती कशी हाताळली असती ?’, असा विचार करून मी त्यावर मात करतो.’
५ आ २ इ. ‘गीता नुसती पाठ करण्यापेक्षा ती समजून घेऊन आचरणात आणली, तरच गीता कळली’, असे म्हणता येणे : या मुलाखतीत श्री. भारद्वाज म्हणतात, ‘‘लहानपणी माझे आजोबा आणि वडील यांनी मला संस्कृत भाषा शिकवली. त्यामुळे मला ‘महाभारता’च्या चित्रीकरणाच्या वेळी संस्कृतमध्ये भगवद़्गीतेतील संवाद म्हणायला सोपे गेले. आजही मी आध्यात्मिक जीवन जगतो. लोक मला विचारतात, ‘‘तुम्हाला गीता पाठ असेल ना ?’’ मी त्यांना सांगतो, ‘‘मला नाही; पण आमच्याकडील पोपटाला पाठ आहे !’’ गीतेतील ‘कर्मण्येवाधिकारस्ते …. ।’ (श्रीमद़्भगवद़्गीता, अध्याय २, श्लोक ४७) , म्हणजे ‘तुला केवळ कर्म करण्याचा अधिकार आहे’, हा श्लोक म्हणजे वैश्विक नियम (Cosmic Law) आहे. त्यामुळे मला वाटते, ‘गीता केवळ पाठ करून उपयोग नाही, तर गीतेतील प्रत्येक श्लोक समजून घेऊन तो आचरणात आणला, तरच तुम्हाला गीता कळली’, असे म्हणता येईल.
५ आ २ ई. पाल्यांना अध्यात्मात रुची निर्माण होण्यासाठी पालकांनी त्यांना केवळ कर्मकांड न शिकवता त्यातील अध्यात्म समजावून सांगितल्यास मुलेे श्रद्धेने कृती करतील ! : कर्मकांड करतांना त्यामागील अर्थ समजून घेऊन कर्माशी एकरूप होऊन कर्म करावे. पाल्यांना शिकवतांना केवळ ‘नमस्कार कर !’ असे सांगितले, तर ती ऐकणार नाहीत; मात्र ‘नमस्कार’, म्हणजे तुमच्या आतील ईश्वराला माझा नमस्कार असो ! मी तुम्हाला भगवंताचे स्थान देतो !’, असा त्या कृतीमागील अर्थ समजावून सांगितला, तर मुले श्रद्धेने नमस्कार करतील आणि नंतर शुद्ध अध्यात्माकडे वळतील. मी माझ्या दोन्ही मुलींना श्री दुर्गासप्तशतीतील श्लोक त्यातील भावार्थासह शिकवले आहेत.
५ आ २ उ. भगवान श्रीकृष्णाचे पात्र साकारतांना केलेले प्रयत्न आणि शिकायला मिळालेली सूत्रे ! : भगवान ‘श्रीकृष्ण’ साकारण्यासाठी पुष्कळ अभ्यास करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने मी ‘श्रीकृष्णा’ची व्यक्तीरेखा समजून घेण्यासाठी मराठी आध्यात्मिक साहित्याचे पुष्कळ वाचन केले. श्रीकृष्णाविषयी मला वाटते, ‘तो एक सामाजिक, राजकीय आणि आध्यात्मिक सुधारक होता. तो ‘माखनचोरी’ करतो; तेव्हा त्याला ‘सर्व गोष्टी सर्वांमध्ये समान वाटल्या पाहिजेत’, असे सांगायचे असावे. ‘समाजव्यवस्थेच्या त्रिकोणात’ निर्धन आणि शारीरिक शक्ती असलेले लोक हे या ‘त्रिकोणा’च्या तळाशी असतात, तर बौद्धिक शक्ती असलेले बुद्धीमान लोक हे वरच्या ठिकाणी असतात आणि ते ‘मलई (लोणी)’ मिळवण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी ‘ती मलई सर्वांमध्ये समान वाटली गेली पाहिजे’, असेच श्रीकृष्णाला शिकवायचे असावे.’ श्रीकृष्णाने महिलांचा आदर केला. त्यांच्या मुक्तीसाठी त्यांचे सशक्तीकरण केले. त्याने स्वार्थासाठी किंवा लाभासाठी काहीही केले नाही.’
(क्रमशः)
– कु. रेणुका कुलकर्णी (संगीत अभ्यासक)आणि कु. म्रिण्मयी केळशीकर (नाट्य आणि संगीत अभ्यासक), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा (१७.५.२०२२)
(साभार : विविध सामाजिक संकेतस्थळे)