राज्‍यातून बेपत्ता होणार्‍या मुलींविषयी विधीमंडळात चर्चा करणार ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, १९ जुलै (वार्ता.) – राज्‍यात बेपत्ता होणार्‍या मुलींचा प्रश्‍न गंभीर आहे. एक मुलगी बेपत्ता होत असली, तरी ते योग्‍य नाही. संपूर्ण देशाच्‍या दृष्‍टीने हा प्रश्‍न गंभीर आहे. अन्‍य राज्‍यांच्‍या तुलनेत मुली बेपत्ता होण्‍याचा महाराष्‍ट्राचा क्रमांक कितवा ? हे सांगणे योग्‍य नाही. ‘विधीमंडळात कायदा आणि सुव्‍यवस्‍था यांवरील चर्चेच्‍या वेळी यावर सविस्‍तर चर्चा करू’, असे आश्‍वासन देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिले. राष्‍ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख यांनी महाराष्‍ट्रातून दिवसाला सरासरी ७० युवती बेपत्ता होतात तसेच पुणे येथून २ सहस्र ८५८ मुली बेपत्ता असल्‍याची माहिती सभागृहात दिली. याविषयी १८ जुलै या दिवशी स्‍थगन प्रस्‍ताव आणून चर्चा करण्‍याची मागणी अनिल देशमुख यांनी केली. या वेळी अध्‍यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्‍थगन प्रस्‍ताव नाकारला; मात्र या गंभीर प्रश्‍नाची सरकारने नोंद घेण्‍याचे निर्देश दिले.