जिल्हाधिकार्यांच्या नमाजपठणाच्या बंदीच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाकडून स्थगिती !
एरंडोल (जिल्हा जळगाव) येथील ऐतिहासिक पांडववाडा प्रकरण
जळगाव – जिल्ह्यातील एरंडोल येथील ऐतिहासिक पांडववाड्यातील अनधिकृत मदरसा आणि नमाजपठणावर बंदी घातल्याचा अंतरीम आदेश जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दिला होता. या आदेशाविरोधात मशीद प्रशासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात याचिका प्रविष्ट केली. या याचिकेत जिल्हाधिकार्यांचा आदेश रहित करण्याची मागणी करण्यात आली. या प्रकरणी १८ जुलै या दिवशी सुनावणी झाली. त्या वेळी जिल्हाधिकार्यांनी मनाई केलेल्या हंगामी आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाचे न्यायमूर्ती आर्.एम्. जोशी यांनी स्थगिती दिली.
पुरातत्व विभागाच्या खुलाशात या जागेचा वापर नमाजासाठी होत असल्याचा उल्लेख असल्याने पुरातत्व विभागाचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी पुढील सुनावणी २७ जुलैला ठेवण्यात आली.
पांडववाड्याचे वृत्त पाकिस्तानातील ‘डॉन’ वृत्तपत्रात प्रसिद्ध !पांडववाड्याच्या संदर्भात पाकिस्तानच्या ‘डॉन’ या वृत्तपत्रात १६ जुलै या दिवशी वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यामुळे एरंडोल येथील पांडववाडा परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दिल्या आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि बजरंग दल यांचे सदस्य असलेले तक्रारदार प्रसाद दंडवते यांनी मेच्या मध्यात जिल्हाधिकारी मित्तल यांच्याकडे तक्रार प्रविष्ट केली होती, असे या वृत्तात म्हटले आहे. यामुळे अन्वेषण यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. |