ए.पी.एम्.सी. वाहतूक पोलिसांकडून १६ लाख ८८ सहस्र रुपये थकीत ‘ई-चलन’च्या दंडाची वसुली !
नवी मुंबई, १९ जुलै (वार्ता.) – वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्यांवर ‘ई-चलन’च्या माध्यमातून दंड आकारला जातो. या प्रकरणी ए.पी.एम्.सी. वाहतूक पोलिसांकडून १७ दिवसांत १६ लाख ८८ सहस्र रुपये इतक्या थकीत ई-चलनच्या दंडाची वसुली करण्यात आली आहे, अशी माहिती एपीएम्सी वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांनी दिली.
नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी ई-चलनच्या थकबाकीची वसुली करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार ही कार्यवाही चालू आहे. या अंतर्गत ४ पेट्रोल पंपांच्या ठिकाणी ई-चलन दंड भरण्यासाठी फलक लावण्यात आले आहेत. त्यामध्ये अधिकार्यांचे संपर्क क्रमांकही प्रदर्शित करण्यात आले आहेत. काही वाहनचालकांना त्यांच्या वाहनावर प्रलंबित दंड असल्याचे ठाऊक नसते. त्यासाठी पेट्रोल पंप, सोसायटी आणि रस्त्यावर मोहीम राबवून वाहनचालकाकडे असलेल्या थकित रकमेची वसुली करण्याची कार्यवाही चालू आहे. त्यानुसार ए.पी.एम्.सी. वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, नागरिकांनी त्यांच्या वाहनावर प्रलंबित दंड आहे का, याची निश्चिती करावी. यासाठी त्यांनी ए.पी.एम्.सी. वाहतूक पोलीस कार्यालय, पेट्रोल पंप किंवा ऑनलाईन पडताळणी करून ही रक्कम भरून पोलिसांना सहकार्य करावे.