सावित्रीबाई फुले महिला वसतीगृहात सुरक्षेच्या दृष्टीकोनातून उपाययोजना करण्याचे चंद्रकांत पाटील यांचे निर्देश
मुंबई येथील सावित्रीबाई फुले वसतीगृहातील हत्या प्रकरण
मुंबई, १९ जुलै (वार्ता.) – येथील सावित्रीबाई फुले महिला वसतीगृहात कर्तव्यावर असणार्या सुरक्षारक्षकानेच वसतीगृहातील मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या केली. त्यानंतर त्याने आत्महत्या केल्याची घटना ६ जून या दिवशी उघडकीस आली होती. या प्रकरणी सावित्रीदेवी फुले महिला वसतीगृहाच्या अधीक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच सर्व वसतीगृहांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून वसतीगृहांच्या परिसरात अद्ययावत ‘सी.सी.टी.व्ही.कॅमेरे’ लावण्याच्या निर्देशासह अन्य उपाययोजनांविषयी निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकरणी मरीन ड्राईव्ह, पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून सदर गुन्ह्यातील मृत्यू पावलेल्या आरोपीच्या विरोधात न्यायालयात अंतिम अहवाल सादर करण्याची कार्यवाही पोलीसांकडून चालू आहे, अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी १८ जुलै या दिवशी विधान परिषदेत दिली. सदस्या डॉ. मनीषा कायंदे यांनी महिलांच्या वसतीगृहांतील समस्यांविषयी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देतांना ते बोलत होते. या वेळी झालेल्या चर्चेत सदस्य श्री. प्रवीण पोटे-पाटील, श्री. विलास पोतनीस, श्री. सुनिल शिंदे, श्री. अमोल मिटकरी, श्री.विक्रम काळे, श्री.शशिकांत शिंदे यांनी सहभाग घेतला.
मुंबईसह राज्यातील मुलींच्या वसतिगृहात त्यांच्या सुरक्षिततेसाठी शासनस्तरावर राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांबाबत विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या लक्षवेधी सत्रात विधान परिषद सदस्यांना माहिती दिली.@CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks pic.twitter.com/2devsPiIx8
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) July 18, 2023
मंत्री चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की,
१. महिला आयोगाच्या प्रतिनिधींनी ७ जून या दिवशी वसतीगृहास भेट देऊन घटनेची माहिती घेतली आहे. तसेच प्रस्तुत घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने सदर घटनेची चौकशी करण्यासाठी राज्य प्रकल्प संचालक, राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान, मुंबई आणि कुलगूरु, एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबई यांची द्वीसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे.
२. उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत राज्यातील सर्व शासकीय वसतीगृहांची सुरक्षा पडताळणी करुन अहवाल सादर करण्यासाठी संचालक, उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.